राज्यात विजेची मागणी वाढली, पुरवठ्याची कसरत

सर्वाधिक मागणीच्या तीन महिन्यांत सलग पाचव्या वर्षी पुरवठा घटला

Story: पिनाक कल्लोळी। गोवन वार्ता |
03rd May, 12:30 am
राज्यात विजेची मागणी वाढली, पुरवठ्याची कसरत

पणजी : राज्यात २०१९-२० ते २०२३-२४ या पाच आर्थिक वर्षांत सरासरी सर्वाधिक वीज वापर होणाऱ्या तीन महिन्यांत ६८७.२ मेगावॅट विजेची मागणी होती. तर या तुलनेत केवळ ६५९.४ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला. पुढील काही वर्षांत विजेची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी तमनार सारख्या प्रकल्पांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विजेची मागणी सर्वाधिक होती. वाढत्या उकाड्यामुळे फ्रिज, एसी, पंखे व अन्य विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे साहजिकच विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात एप्रिल ते जून २०२३ दरम्यान सर्वाधिक ७७१ मेगावॅट विजेची मागणी होती. या दरम्यान खात्याकडून ७१३ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला होता.

२०२२-२३ या वर्षात राज्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या दरम्यान सर्वाधिक ७२७ मेगावॅट विजेची मागणी होती. तर खात्याकडून ७१७ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला होता. २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ६५१ मेगावॅट विजेची मागणी होती. या वर्षी खात्याकडून ६२० मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला होता. २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ६४५ मेगावॅट विजेची मागणी होती. तर खात्याकडून ६२२ मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला होता. 

गोवा तमनार ट्रान्स्मिशन प्रकल्प हा राष्ट्रीय ग्रीड विकास प्रकल्पातील एक भाग आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी गोवा तमनार ट्रान्स्मिशन प्रोजेक्ट लिमिटेड द्वारे (जीटीटीपीएल) केली जाणार आहे. यामध्ये गोव्याची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ४०० केव्हीची वाहिनी देखील टाकण्यात येणार आहे. प्रकल्पातील गोवा टप्प्यात शेल्डे ते म्हापसा ४०० केव्ही, धारबांदोडा ते शेल्डे २२० केव्ही, शेल्डे ते नरेंद्र ४०० केव्ही या तीन ट्रान्स्मिशन लाईनचा आणि ४००/२०० धारबांदोडा पुरवठा प्रणालीचा समावेश आहे. राज्यातील सध्याच्या ट्रान्स्मिशन लाईन या सुमारे ३० ते ५० वर्षे जुन्या आहेत. नव्या लाईनमुळे गोव्याला जास्त प्रमाणात वीज मिळणार आहे.

हेही वाचा