उन्हाळ्याचा मधुमेहावर परिणाम...

उन्हाळ्याची चाहूल जरा लवकरच लागली की, एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंतच तापमान अगदी उच्च असते. अन् मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. अशा वेळेस साधारणपणे डिहायड्रेटेड वाटणे, खूप तहान लागणे, डोकेदुखी, गरगरणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यात मधुमेहासारखा त्रास असला तर वाढलेल्या तापमानामुळे आरोग्याची अधिक हानी झालेली दिसून येते.

Story: आरोग्य |
27th April, 05:14 am
उन्हाळ्याचा मधुमेहावर परिणाम...

एरवीही मधुमेहींना वर्षभर रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात ठेवणे अगदी आव्हानात्मकच असते. उन्हाळा मधुमेहाची स्थिती अधिक संवेदनशील बनवतो. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होते व थकवा, डिहायड्रेशन यांसारख्या कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे कठीण होऊन जाते. यामुळे उन्हाळ्यात मधुमेहाबाबत अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते.

मधुमेहींच्या शरीरातील पाणी जास्त लवकर कमी होते, ज्यामुळे त्यांना सहजपणे डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच, कमी पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे सतत व जास्त लघवी होऊ शकते, ज्यामुळेही डिहायड्रेशन होऊ शकते.

उष्णतेमुळे मधुमेहींच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना हानी पोहोचू शकते, घामाच्या ग्रंथींवर परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीराच्या सामान्य तापमानावर परिणाम होतो व शरीराला हवे तसे थंड राहता येत नाही. यामुळे उष्मा, थकवा आणि उष्माघात होऊ शकतो व कधीकधी पुढे जीवितहानीही होऊ शकते.


उन्हाळ्यात मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?

डिहायड्रेशन टाळा : उन्हाळ्याच्या दिवसात शरीर उष्णतेच्या संपर्कात येऊन, घामाद्वारे जास्त पाणी गमावले जाते व डिहायड्रेशन होते. उन्हाळ्यात अशा वेळेस भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील पाण्याची योग्य पातळी राखली जाऊ शकते व डिहायड्रेशन टाळले जाऊ शकते. पण साखरयुक्त-गोड पेये मात्र वगळावी. 

साखर वेळेवर तपासा : रक्तातील साखरेच्या पातळीचे वेळेवर निरीक्षण करणे आवश्यक आहे. गरम हवामानामुळे साखरेच्या पातळीवर परिणाम होऊन हृदयाची गती वाढणे आणि घाम लवकर येणे यासारखी लक्षणे दिसतात. तसेच इन्सुलिन घेत असल्यास शारिरीक गरजेप्रमाणे इन्सुलिनच्या प्रमाणात किंवा वेळेत बदल आणावे लागू शकतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मद्यपान आणि कॅफिन टाळा : मद्य, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, कॅफीनयुक्त पेयांच्या सेवनाने तात्पुरती तहान भागू शकते. पण या पेयांच्या सतत सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि अधिक लघवी होऊ शकते. अशा पेयांचे सेवन कमीतकमी ठेवावे.

शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवण्यात मदत होते. उष्णतेमुळे व्यायाम करणे थोडे त्रासदायक होऊ शकते. पण सक्रिय राहण्यासाठी व शरीराची उष्णता टाळण्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते. नियमित व्यायामादरम्यानही रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होऊ शकते म्हणून त्यासोबत नियमितपणे साखरेची चाचणीही करावी. 

उन्हात जाणे टाळा : सतत उन्हात राहिल्याने शरीरावर ताण येतो आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उन्हाळ्यात जास्त वेळेपर्यंत उन्हात राहणे टाळावे. उन्हात त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा, कॅप, सनग्लासेस, छत्रीचा वापर करावा. स्कार्फ/ सनकोट/ जॅकेट वापरून बाहेर जाताना शरीराच्या उघड भागांना झाकण्याचा प्रयत्न करावा.

आहारावर नियंत्रण ठेवा : मधुमेहींची साखर नियंत्रणात ठेवणे हे बऱ्यापैकी आहारावर आधारित असते. दर दोन तासांनी व थोड्या थोड्या प्रमाणात आहार घ्या. शरीराला हायड्रेटेड ठेवणारी व एनर्जी देणारी फळे आणि सॅलड्स आहारात ठेवावी. संत्री, द्राक्षे, किवी, एवोकॅडो, पीच, मनुका, सफरचंद, टरबूज, ब्लॅकबेरी, काकडी, पालक, मुळा यासारखी दीर्घकाळ पोट भरून ठेवणारी व ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवणारी फळे व सॅलड्स खावीत.  

जखमा व पायाची निगा घ्या : मधुमेह-संबंधित पायाची इजा टाळण्यासाठी अनवाणी चालणे टाळा, दररोज आपल्या पायांची तपासणी करा. मधुमेहींमध्ये जखमा भरण्यास उशीर होतो व उष्णतेमुळे ही क्रिया लांबू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात जखमा होऊ न देणे व झालेल्या जखमींची काळजी घेणे मधुमेहींना आवश्यक असते.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर