कल्पनाशक्तीची भरारी

Story: मनातलं |
27th April, 06:12 am
कल्पनाशक्तीची भरारी

माणसाला उपजतच एक परमेश्वरी देणगी प्राप्त झालेली आहे आणि ती म्हणजे कल्पना करण्याची कुवत आणि शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या शक्तीचा प्रत्यय येत असतो. निरागस, निरामय मनाची मुले यात फारच रमतात. छोट्या आशुला मी त्या दिवशी विचारलं, "अगं काय कसली एवढी तंद्री लागलीय?" कारण ती कुठेतरी एकटक शून्यात बघत बसली होती. तर मला म्हणाली, "अगं मी कल्पना करतेय की या फुलपाखरासारखं मला पण या फुलावरून त्या फुलावर उडत जाता आलं असतं तर काय मज्जा आली असती ना!" "अगं पण तू काही त्या फूलपाखरासारखी वजनाने हलकी नाहीस. तू फुलावर बसलीस तर फुलाचा होईल चेंदामेंदा." "हो गं मला हे लक्षातच आलं नाही." अशी मुलांची कल्पनाशक्ती असते जी प्रत्यक्षाचा विचार करत बसत नाही. त्यांची कल्पनेची उडान अशक्य तेही कल्पनेत शक्य करू पहात असते. ती त्यात रमलेली असल्याने त्यांचं विश्वच ते उभं करतात. पूर्वी लहान मुलांसाठी टीव्हीवर 'अॅलीस इन वंडर लँड' ही सिरियल दाखवली जायची. त्यात मुलांच्या कल्पनाशक्तीचे रूप पहायला मिळायचे. 

 रामदास स्वामी म्हणतात 'कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत|तेथे मी निवांत बैसईन|' त्यांचे हे म्हणणे कल्पनाशक्तीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. एकांतात निवांत बसल्यामुळे हे शक्य होतं. त्याची सत्यता पटते. कल्पना करता येणे ही एक मानसिक शक्ती आहे. त्यामुळे मनातल्या मनात काही नवनिर्मिती करण्याची ओढ किंवा आसक्ती असते ती पूर्ण होत असते. ही सर्जनात्मक शक्ती विज्ञानात फार उपयोगी पडते. मोठमोठे शोध लागले याचे कारण त्या शास्त्रज्ञ लोकांची कल्पनाशक्ती. गॅलिलिओ, न्यूटन, आइनस्टाईन, फॅरेडे अशी अनेक संशोधकांची नावे सांगता येतील. कधी कधी अशी अचाट कल्पनाशक्ती आपल्यात आहे हेच बरेच जणांना माहीत नसतं. कल्पना चित्र रेखाटण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. ती तुमची प्रबळ शक्ती ठरू शकते. 


आपण अगदी काहीही कल्पना करू शकतो. अशा कल्पनेवर आधारित निबंध शाळेत असताना लिहायला दिले की मुलांची कल्पनाशक्ती त्यातून स्पष्ट होत जाते. माणसाला जर पंख असते तर त्याला उडता आले असते ह्या कल्पनेतून विमानाचा शोध लागला, निर्मिती घडली. कल्पनात्मक निबंध हे कल्पनाशक्तीच्या वाढीला वाव देणारे असतात. त्यांच्या शक्तीचा विकास होतो. कल्पनेतून संकल्पना निर्माण होते आणि संकल्पनेतून नवनिर्माण होऊ शकतं. आइनस्टाईनच्या मते कल्पना ही वास्तवापेक्षा अधिक महत्त्वाची असते. कोणतीही गोष्ट ही मूर्त स्वरूपात येण्यापूर्वी कुणाच्या तरी कल्पनेतून साकार झालेली असते. तिच्यात ती गोष्ट वास्तवात आणायचं सामर्थ्य असतं. जे प्रत्यक्षात नाही किंवा होण्याची शक्यताही नाही अशाही गोष्टी या कल्पनाशक्तीद्वारे शक्य होताना दिसतात. त्यात मानसिक सामर्थ्य असते. कधी कधी इंद्रियांच्या अनुभवाच्या अस्पष्ट अशा ठशांना उजाळा देणारी ही शक्ती असते. 

विविध कलांचा आस्वाद घेणं, त्यावर विचार, मनन करणं याद्वारे सुद्धा कल्पनाशक्ती वाढीस लागते. एखाद्या गायकाचे गाणे आवडत असेल तर ते ऐकून ऐकून त्याचा सराव करत आपणही त्याच्यासारखे मोठे गायक होऊ ही कल्पना मनात रुजते, तिला खत पाणी घातले की ती प्रत्यक्षात उतरते. कधी कधी पूर्वानुभवावरती पण अशा कल्पनाशक्तीचा विस्तार करत मनात तीची जुळणी करताना दिसतात. आपले लक्ष्य, ध्येयपूर्ती यासाठी ते उपयुक्त ठरतं.

कल्पनाशक्ती ही अनेक शोधांची जननी आहे असे म्हटले जाते. ही शक्ती म्हणजे मानवासाठी मोठे वरदान तर आहेच पण ती महान शक्तीच्या रूपात प्रत्ययास येते. विज्ञानातले शोध ही त्याचीच सत्यता पटवून देतात पण हे शोध लावणारे शास्त्रज्ञ कवी कल्पनेत रमणारे नसतात तर प्रयोग करून ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करणारे असतात म्हणूनच नवनवीन शोध लागतात. कल्पनाशक्तीत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असते. 

कधीकधी अशा काल्पनिक कथा, कादंबऱ्या मनाला भुरळ घालत असतात कारण माणसाचे मन हे कल्पनेत रममाण होणारे असते. या बाबतीत हॅरी पॉटरचे उदाहरण देता येईल. आठ ते दहा-बारा वर्षाच्या मुलांसाठी जादूगार हॅरी पॉटर नावाचा मुलगा हीरो बनतो. संपूर्णपणे काल्पनिक कादंबरीची ही मालिका मुलांना अतिशय वेड लावून गेली. जादूगार, चेटकीण, जादू नगरी अशा कल्पनारम्य कल्पना त्यात आहेत ज्या मुलांना भारावून टाकतात. 'दिवास्वप्न' पाहणे, कला निर्माण करणे, कथा लिहिणे, संगीतरचना करणे, अभिनय करणे अशा गोष्टी केल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीत वाढ होते. त्यांच्या मनाचा नवीन तऱ्हेने वापर करण्याची सवय होते. कल्पना म्हणजे आपल्या मनातले विचारच असतात. कल्पना करता येणे हे माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्य आहे. ते एक शक्तिशाली साधन आहे. कल्पनाशक्ती तुमचे जीवन बदलू शकते. कारण आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपल्या कल्पनाशक्तीचा प्रभाव असतो. कल्पनाशक्ती ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जितकी तुमची कल्पनाशक्ती वापराल, तेवढा तुमच्या कल्पनेचा स्नायू मजबूत होईल.

आपल्या मनात अशा अनेक भावभावना असतात. कुतूहल, धाडस, रहस्य, वैचित्र्य, जिद्द या भावना कल्पनाशक्तीद्वारे जपता येतात, खुलविता येतात. कुतूहल असेल तर आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून ते कुतूहल काय असेल याचा शोध घेता येतो किंवा रहस्य उलघडण्यासाठी कल्पनाशक्ती असणे अत्यंत गरजेचे असते. तरच कोडे सुटायला मदत होईल. कल्पना करणे म्हणजे मनात विचारांचे काहूर उठणे. मनात विचाराचे सतत मंथन चालू असते. त्याला कसलीच सीमा किंवा मर्यादा आड येत नाही म्हणूनच बहिणाबाई म्हणतात मन कसं असतं तर “आता होतं भुई वर गेलं गेलं आभाळात.” ही किमया मनाला कल्पनाशक्तीमुळेच करता येते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.