रुग्णांची सेवा करत जनजागृती करणारी राधिका पागी

Story: तू चाल पुढं |
27th April, 07:16 am
रुग्णांची सेवा करत जनजागृती करणारी राधिका पागी

कोविड या संसर्गजन्य रोगाचा विळखा जेव्हा जगाला पडला आणि सर्वत्र हाहाकार माजला, तेव्हा संपूर्ण जग स्तब्ध झाले. प्रत्येकाने आपल्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करताना एकमेकांशी संपर्क तोडून स्वत:ला सर्वांपासून दूर ठेवले. अशा वेळेस रुग्णांना सेवा देणारे देवदूत म्हणजेच डॉक्टर्स आणि नर्स मात्र आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा नित्य देत होते.

रावणफोंड, मांडोपा येथे राहणार्‍या राधिका पागी या प्रायमरी हेल्थ सेंटर नावेली आणि सब सेंटर आके बायश येथे MPHW म्हणजेच मल्टी परपज हेल्थ वर्कर म्हणून गेली १८ वर्षे काम करत असून कोविड काळात त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल आजही या विभागातील सर्व नागरिक त्यांचे कौतुक करताना दिसतात. 


कोविड काळात माणसाचा माणसाशी संपर्क जवळजवळ तुटल्यातच जमा होता. समारंभ, उत्सव आदी सर्व काही बंद होते. माणसे एकमेकांशी समोर येण्याचे टाळत होते. जे कोविड बाधित होते, त्यांच्याशी तर चार हात दूर राहून ही बोलायला कोणीही तयार नव्हते. या कोविड बाधित रुग्णांची जवळ जाऊन तपासणी करणे म्हणजे अक्षरश: मृत्यूच्या दाढेत स्वत:हून जाण्यासारखे होते. अशा वेळी राधिका या स्वत: कोविड बाधितांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते औषध देण्याचे काम नियमित करत होत्या. त्याचप्रमाणे कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये त्यांनी काम केले. कोविड रूग्णांच्या घरी जाऊन रुग्णांना तपासून त्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये भरती करणे, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे,  घराघरातून कोविड संरक्षक लस देणे हे करताना त्यांनी प्रसंगी लोकांचे अपशब्दही ऐकले. काही काही घरातून ही लस घेण्यासाठी प्रतिकार होत होता, त्यांना समजावताना त्यांच्या नाकीनऊ यायचे. कारण कोविड संरक्षक लस टोचून घेणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणे अशी व्यर्थ धारणा काही लोकांची झाली होती. त्यांना समजावून सांगताना अनेकांचे अपशब्द झेलूनही त्यांना कोविड लस घेण्यास प्रवृत्त केले. कोविड बाधित रुग्णांना इतर लोकांशी संपर्क करण्यास मज्जाव होता अशा वेळेस राधिका यांनी आपल्या जिवाची बाजी लावली आणि अनेक रुग्णांची सेवा केली.

त्यांच्या या कामाकरीतात्यांचे अनेक संस्थांनी  कौतुक केले.

हेल्थ वर्कर म्हणून काम करताना त्यांना कोविडच्या काळात जे अनुभव आले, ते अनुभव त्यांना कायम लक्षात राहण्याजोगे आहेत. कारण बाहेर चिटपाखरूही फिरत नसताना त्या आपल्या घराबाहेर पडून रूग्णांच्या सेवेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण वाचवत होत्या. अशा वेळी त्यांना कोविड होण्याचा दाट शक्यता होती. कोविडच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेतही त्यांची ही सेवा अखंडित चालू होती.

राधिका यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर सरकारी नर्सिंग स्कूल मडगाव येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि १९९८ मध्ये त्या डिप्लोमा इन नर्सिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आजपर्यंत त्यांनी ब्रागांजा हॉस्पिटल मडगाव, बोरकार हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम केले आहे तर ग्रेस कार्डियाक आणि आपोलो हॉस्पिटलमध्ये ओटी इन्चार्ज म्हणून काम केले आहे. सध्या त्या नावेली मडगाव आरोग्य केंद्रातर्फे आके बायश शांती नगर हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत. इथे काम करताना वागण्यात आणि बोलण्यात प्रचंड सहनशक्ती लागते. स्वत:चा विचार न करता त्यांना आधी रुग्णाचा विचार करावा लागतो. स्वत:च्या कितीही मोठ्या काही अडचणी आल्या, तरी त्या बाजूला सारून आधी रूग्णाच्या सेवेसाठी प्राधान्य देतात.

हेल्थ सेंटरमध्ये काम करताना त्या आरोग्य विषयक जनजागृती करण्याचेही काम करत आहेत. मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया, फायलेरिया सारख्या रोगांची साथ आल्यास जिथे बांधकाम चालू आहे तिथे जाऊन, किंवा मजूर वस्तीत जाऊन जनजागृती करताना त्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि हे रोग झाल्यास त्यांना तपासून योग्य ती औषधे देताना राधिका यांना प्रसंगी वेळेचा आणि स्वत:चाही विसर पडतो. या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करताना त्या कुष्ठरोग, टी बी सारखे असाध्य रोग होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन करतात. जर असा रुग्ण सापडला तर योग्य ती औषधे देऊन त्यांना मार्गदर्शन करताना त्या रोगाबद्दल जनजागृतीही करतात. अंगणवाडी, शाळा इथे जाऊन त्या मुलांना विविध रोगाची माहिती देताना ते होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, याचे ही मार्गदर्शन करतात. नवजात शिशू तसेच त्यांच्या आई ने कोणती काळजी घ्यावी, नवजात शिशू ला कोणती लस कधी द्यावी याचे ही त्या मार्गदर्शन करतात.

रावणफोंड भागातील प्रत्येक घरातील व्यक्ती त्यांच्या परिचयाची आहे. कोविड काळात त्यांनी घराघरात दिलेल्या भेटीमुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या या सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन गोवा सरकार आणि एनजीओ, सम्राट क्लब नावेली, ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


कविता प्रणीत आमोणकर