फुलासारखे सुंदर हास्य लाभलेली फुलारिना

गोव्यालगत असणाऱ्या बेळगाव भाजी मंडईतून भाज्या आणि फळांची आवक गोव्यात रोज मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे गावठी भाज्या, फळे विक्रेते यांच्याकडे जरी दुर्लक्ष होत असले तरी अस्सल गोवेकर अशा गांवठी भाज्या विक्रेत्यांकडून खास खरेदी करताना दिसतात. गावठी भाज्या, गावठी फळे यांची चव काही निराळीच. सेंद्रीय खते वापरुन या भाज्यांचे उत्पादन घेतल्याने ही गांवठी फळे, गांवठी भाज्या जरा जास्तच रुचिक लागतात.

Story: तू चाल पुढं |
20th April, 06:37 am
फुलासारखे सुंदर हास्य लाभलेली फुलारिना

मडगावच्या नगरपालिका उद्यानाच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्यावर फुलारिना ही मध्यमवयीन महिला गांवठी भाज्या व फळे विक्रीसाठी घेऊन बसलेली आपल्याला नेहमीच दृष्टीस पडते. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची नजर तिच्यावर पडताच त्यांना सुंदर अशी स्माइल देत, "चिक्कू जाय गे बाय?... सवाय आसा!" किंवा, "भाजी व्हर गे... ताजी असा पय गे..." असे सांगत टोपलीतील भाजी दाखवत आपल्याकडील भाज्या व फळे विकताना दिवसभराच्या श्रमाने फुलारिना थकली, तरी तिच्या तोंडावरचे हास्य संध्याकाळ झाली तरी कधीच कमी झालेले दिसत नाही.

फातोर्डा येथे राहणारी ही फुलारिना सकाळी सात वाजता घरातून निघते. गांवठी भाज्या, फळांचे बोचके घेऊन ती मडगावच्या बस स्टॉपवर उतरून मडगाव नगरपालिकेच्या बागेतील मधल्या रस्त्यावरील आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसते आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंशी संवाद साधत आपल्या मालाची विक्री करते. आपल्यासोबत दुपारच्या जेवणाचा डबा आणल्यामुळे तिचे दुपारचे जेवणही त्याच जागेवर होते आणि तिथेच ती संध्याकाळपर्यंत आपल्या फळे, भाज्यांची विक्री करत असते.

रोज सकाळी सात वाजता येऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत उद्यानाच्या कट्ट्यावर एकाच ठिकाणी अवघड अवस्थेत बसून आपल्या पोट्यापाण्यासाठी हा लहानसा व्यवसाय सांभाळणारी फुलारिना पाहिली, की तिच्या अंगातली जिद्द प्रकर्षाने जाणवते. उद्यानाच्या कट्ट्यावर अवघडलेल्या स्थितीत बसून भाज्या, फळे विक्री करण्यासाठी तिचा येणार्‍या जाणाऱ्यांशी अखंड संवाद चालू असतो आणि एखादे गिऱ्हाईक जर तिच्याकडे आले तर तिच्या चेहऱ्यावरील हास्य हे अधिक फुलते.

गेली ३० वर्षे फुलारिना आपल्या पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करत आहे. त्यात तिला अजिबात खंत वाटत नाही. सुरुवातीला आपल्या घरीच अंगणात रोवलेली तांबडी भाजी, धवी भाजी, चिटकी मिटकी, वांगी, भेंडे, तेंडली आदी भाज्या घेऊन ती विक्रीस बसत असे. परंतु घराची जबाबदारी जशी वाढली, तशी घरच्या भाजीचे पीक घेणे तिला अशक्य होऊ लागले. मग जसे जमेल तसे भाजीचे पीक घेताना ती वाड्यावरील इतर लोकांनी रोवलेली भाजी घेऊन त्यांची विक्री करू लागली. मोसमानुसार काजुच्या बिया, आंबे, फणस आदी फळांचीही विक्री करताना पपाया, चिक्कू, कैरी, अननस या फळांची विक्री ती करत आहे.

उन्हाळा, हिवाळा असो वा पावसाळा... फुलारिनाने आपली ही जागा कधीच सोडली नाही. उद्यानात फिरायला येणारी बच्चे कंपनी, त्यांना सांभाळणाऱ्या त्यांच्या आया तसेच उद्यानात फिरायला येणारे, संध्याकाळी कामावरून सुटलेल्या नोकरदार बायका या फुलारिनाचे खास कायमचे ग्राहक आहेत. उन्हाळा, हिवाळा या मोसमात ठीक आहे. पण पावसात ही फुलारिना छत्री घेऊन हा आपला व्यवसाय चालू ठेवते हे ऐकून तर तिची कमाल वाटली.  

आपल्या या छोट्याशा व्यवसायावर टिचभर पोटाची खळगी भागवताना तिने आपल्या एका मुलाचे आणि एका मुलीचे लग्नही करून दिले. मुलाचे लग्न झाल्यावर घरी सून आली आणि फुलारिनाचे स्वयंपाक घरातील काम कमी झाले. त्यामुळे आता ती निर्धास्त आहे. सुनेने दिलेला जेवणाचा डबा दुपारी उद्यानाच्या कट्यावर बसून खाताना तिला दुपारी लवंडण्यासाठी जागाही नसल्याने तिथल्या तिथेच बसून ती ग्राहकांच्या प्रतिक्षेत एखाद्या व्रतस्थसारखी बसून राहते!


कविता प्रणीत आमोणकर