गोव्यात ७ रोजी मतदान : रविवारी सायंकाळपासून उत्तरेत ‘जमाव बंदी’, दारू विक्रीवर बंदी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 04:05 pm
गोव्यात ७ रोजी मतदान : रविवारी सायंकाळपासून उत्तरेत ‘जमाव बंदी’, दारू विक्रीवर बंदी

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात मंगळवार, ७ मे रोजी गोव्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून ८ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश  जारी करण्यात आला आहे. हा आदेश मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजीही लागू असेल.

वरील कालावधीत बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि, बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल, असा फलक बाहेर लावावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मतदारसंघात ५ मे रोजी संध्या. ६ वाजल्यापासून ते ८ मे रोजी संध्या. ६ वाजेपर्यंत पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यास किंवा कोपरा बैठका आयोजित करण्यास बंदी लागू केली आहे.

त्याचप्रमाणे पैशांचे वाटप किंवा दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेली वाहने सोडून उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मतदारांना कोणतेही आमिष दाखविण्याचे टाळण्यासाठी खाजगी वाहनांचीही तपासणी होईल. कामावरील सार्वजनिक नोकर, मान्यता असलेल्या विवाह किंवा अंतयात्रेस किंवा इतर खास प्रसंगांसाठी बंदी लागू नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा