हडफडे पंचायतीच्या डोळ्यासमोरच अवैध बांधकाम; तक्रारी केल्यावर पंचायत मंडळाकडून पाहणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd May, 04:21 pm
हडफडे पंचायतीच्या डोळ्यासमोरच अवैध बांधकाम; तक्रारी केल्यावर पंचायत मंडळाकडून पाहणी

म्हापसा : हडफडे-नागवा येथे पंचायत घरापासून जवळच कोमुनिदादच्या जागेतील नाल्यावर अतिक्रमण बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार ‘कळंगुट मतदारसंघ मंच’ने केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळाने आज या बांधकामाची पाहणी केली.

‘कळंगुट मतदारसंघ मंच’ या संघटनेची तक्रार आल्यानंतर पंचायतीने ते बांधकाम बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज सकाळी पंचायत सचिव रघुवीर बागकर व कर्मचार्‍यांनी या सर्वे क्रमांक १३५/२४ मधील बेकायदा बांधकामाची पाहणी केली व मोजणी केली. यावेळी मुख्य नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे.  


हडफडे-नागवा येथे नाल्यावर बेकायदेशीररित्या केलेल्या बांधकामाची पाहणी करताना पंचायत सचिव रघुवीर बागकर व कर्मचारी.  

मंचचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर व पदाधिकार्‍यांनी या बेकायदा बांधकामविरुद्ध पंचायत तसेच संबंधित सरकारी प्राधिकरणांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीच्या आधारे हडफडे-नागवाच्या प्रभारी सरपंच सुषमा नागवेकर यांनी हे बेकायदा बांधकाम करणारे ‘केपीडी डेव्हलपर्स’ या कंपनीला नोटीस जारी केली होती.

पंचायत किंवा संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक ‘ना हरकत’ दाखला न घेता नाल्यावर काँक्रीट स्लॅबचे बेकायदा बांधकाम केले गेले अाहे. हे बांधकाम त्वरित बंद करावे, असे निर्देशही वरील कंपंनीच्या मालकाला दिले होते. तसेच पाहणीची वेळ पंचायतीने निश्चित केली होती. त्यानुसार पंचायतीने आज ही पाहणी केली आहे.

मंचने पंचायतीसह जलस्त्रोत खात्याकडे तक्रार दाखल केली होती. हडफडे गावातील वरील सर्वे क्रमांकाच्या जागी असलेल्या मुख्य नाला काँक्रिट स्लॅबचे आवरण घालून तो झाकला गेला असल्याचा दावा मंचने केला होता.

पंचायत घराजवळ हा बेकायदा बांधकामाचा प्रकार होत असल्यामुळे रहिवासी व पर्यारणवादी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पंचायत मंडळ व संबंधित खात्यांकडून कायदे व नियम आणि पर्यावरणीय अखंडतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल मंचने नाराजी व्यक्त करीत आवश्यक कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा