चेरी ब्लॉसम : ऋतू बहराचा

आहाहा! सगळीकडे फुलेच फुले, पानांना जागाच नाही; ना कळ्यांचा फुटवा. ना सुकलेल्या फुलांच्या निर्माल्यरूपी कचऱ्याचा मागमूस, असा हा बहराचा ऋतु म्हणजे जपानचा चेरी ब्लॉसम. संपूर्ण जगाला सौंदर्याची भुरळ घातलेला, डोळ्याचं पारणं फेडणारा चेरी ब्लॉसम त्यांच्या भाषेत ‘साकुरा’.

Story: मनातलं |
20th April, 05:47 am
चेरी ब्लॉसम : ऋतू बहराचा

ओसाड झालेल्या निष्पर्ण झाडाच्या खोडातून, फांदीफांदीतून, फुलांचा फुललेला फुटवा , जो नयनरम्य तर असतोच पण निसर्गाचा एक अद्भुतरम्य चमत्कार वाटावा इतका सुंदर अवर्णनीय असतो. फिक्क्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा, एकसारखा दुसरा नाही पण त्यात कुठेही भडकपणा नाही. गुलाबी, गुलाबीसर, जरासा गुलाली पण जर्द गुलाबी नव्हे अशा पांढऱ्या ते लाल या दोन रंगांच्या मधल्या अशा छटा धारण करून ही वृक्षवल्ली मोठ्या दिमाखात ठायी ठायी उभी असलेली पहायला मिळते. 

मार्च-एप्रिल मधल्या या पंधरा दिवसांसाठी जणू स्वर्ग धरणीवर अवतरतो. निसर्गाने ही किमया आपल्याकडे राखून ठेवलेली असते. एकाच वेळी चहू दिशांनी सर्व दूर असा पूर्ण प्रदेश पुष्पमय होऊन गेलेला असतो. कारण त्यांनी झाडांची लागवड करतानाच तशी रचना केलेली दिसते. रस्त्याच्या कडेने, मोठ्या इमारतीच्या दारात, शाळेत, घरच्या अंगणात, फुटपाथवर, बागेच्या कडेने, नदीच्या बाजूबाजूने, डोंगर कड्यावर अगदी पहाल तिकडे हा फुललेला वसंत अवतरीत झालेला दिसतो. आपल्याकडेही वसंत ऋतुत पिवळा धम्मक बहावा, लालबुंद गुलमोहोर, तांबडा भडक पलश, आंब्याचा, काजूचा मोहोर फुललेला असतो. रंगांची विविधता, भडकपणा ही आपल्या वसंताची विशेषणे, पण त्यांच्या साकुरात मात्र रंगांची सौम्य स्वरूपे पहायला मिळतात. त्यामुळे ते रंग नयनांना एक सुखद, शांत गारवा देणारे वाटतात. मंद, शांत, देखणेपण त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असते.


बऱ्याच दिवसांपासून माझ्या बकेटलिस्टमध्ये जपानच्या चेरी ब्लॉसमची नोंद होती पण यंदा मात्र तो योग जुळून आला. आणि मला माझी स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंदही गवसला. टोकियोला आम्ही पोचलो, तेव्हा तिथल्या ढगाळ वातावरणाने आणि पावसाने आमचे स्वागत केले. त्यामुळे मनात जरा साशंकता निर्माण झाली की, जो चेरी ब्लॉसम पहायला एवढा अट्टाहास करून आलो, त्यावर पावसाचे पाणी पडते की काय! पण जसजसे आम्ही दक्षिणेकडे जात गेलो, तसतसा हा बहराचा ऋतु जागोजागी भेटत गेला. डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत जिकडे पाहावं तिकडे फुलांचा बहर असलेले वृक्ष, लतांनी धरणी नटलेली. जणू कुणी वनदेवी फुलांचा साजशृंगार करून उभी होती. 

कानात लोंबते झुंबर, हातात-गळ्यात फुलांचे सर आणि दाटसर हार लेवून ती निसर्ग देवतेच्या स्वागताला सज्ज झाली होती. असंही जपानी संस्कृतीत बौद्ध आणि शिंतो धर्म प्रचलित आहेत. या धर्मानुसार त्यांचे देवदेवता निसर्ग हेच आहेत. निसर्ग हाच देव आणि त्याचीच पूजा करणारे ते लोक आहेत. दरवर्षी या साकुराच्या रूपात ते या देवाची पूजा बांधतात. आपण सत्यनारायण असो, की श्रावणातली कुठली पूजा; भरपूर फुले फळे विकत आणून किंवा झाडांची तोडून ते देवाला अर्पण करतो पण हे लोक कुठेही फुले तोडताना दिसत नाहीत. जसा आहे तसा झाडपानांचा निसर्ग असाच्या असा देवाला अर्पण करतात म्हणूनच तो जास्त मनाला भावतो. 

फुले तोडून वृक्षाची शोभा घालवण्यापेक्षा झाडावरच त्याची सौंदर्यशोभा जास्त खुलून दिसते. ज्याचं आहे ते त्यालाच राहू दे, निसर्गानेच दिलेला हा नजराणा निसर्गालाच अर्पण! त्यामध्ये मग 'मी'पणा येत नाही. 'मी' तुला काही देतोय ही भावना त्यात नसते. त्यांच्या धर्मात लिनता हा मुख्य गुणधर्म. 'मी' तुला काय देणार? हे आहे ते तुझेच आहे. माझ्या अपवित्र हातांनी ओरबाडून त्याचे मांगल्य मी कशाला नष्ट करू? 'फुले तोडू नका' अशी पाटी कुठेही दिसली नाही पण त्यांचा तो अलिखित नियमच आहे. 

  या ऋतूमध्ये अशा बहरलेल्या झाडांच्या खाली बसून लोक वनभोजनाचा आनंद घेताना दिसत होते. सुट्टीच्या दिवशी सर्व कुटुंबियासहित अशा ठिकाणी पिकनिकला येणारे दिसत होते. एकत्र बसून या झाडांखाली लोक वेळ घालवतात, फोटो काढतात. हे दृश्य पाहताच मला माझ्या लहानपणी आम्ही सर्वजण 'आवळी भोजना'ला जायचो त्याची आठवण झाली. सर्व कुटुंब एकत्र राहावं, एकत्र मौजमजा करावी हा त्या मागचा हेतू. कामानिमित्त जमत नाही, पण अशा वेळी सर्वांनी प्लॅनिंग करून चेरी ब्लॉसमचा आनंद घेतात. नवीन लग्न झालेले किंवा लग्न ठरलेले जोडपे 'प्री वेडिंग शूटिंग'साठी अशा झाडांखाली फोटो काढून घेताना दिसत होते. ही त्यांची प्रथा असावी. 'किमोनो' किंवा त्यांचा पारंपरिक ड्रेस घालून ते फोटो शूटिंग करताना दिसत होते. नव विवाहित जोडप्यांची नव्या वैवाहिक जीवनाची सुरुवात अशा चेरी ब्लॉसमच्या बहराच्या साक्षीने करावी ही येथील परंपरा असावी. 

वैयक्तिक आयुष्यातही असाच फुलांचा बहर कायम असावा अशी मनोकामना प्रत्येकाचीच असते. जीवन पुढे जातच असते पण त्या आठवणी पुन्हा पुन्हा जीवनात बहर घेऊन येणाऱ्या असतात म्हणूनच ते क्षण फोटो शूटिंगमधून सेव्ह करून ठेवले जातात. कुठेही गडबड नाही. शांत वातावरणात पुष्प बहराचं ते मंगलमय दर्शन मनाला आणि नयनांना खरोखरीच सुखावून जातं. कुणीही बोलताना आवाज चढवत नाही, ना कुणी वचावचा भांडताना दिसतं. शांततेचे व्रत घेतलेले लोक तीन वेळा कमरेत झुकून अभिवादन करतात. त्यात कुठेही कृत्रिमता वाटत नाही.   

  आपल्याकडे जसा पाऊस आणि शाळा एकाच वेळेला सुरु होतात तसं इथे चेरी ब्लॉसम आणि शाळा एकाच वेळी सुरू होताना दिसतात. शाळेचा पहिला दिवस तोही अशा सुंदर वातावरणात सुरू केला जातो. मोठ्या प्रमाणात झाडांना आलेला बहर आणि एकाच वेळी फुलण्याचे वैशिष्ट्य यामुळे जीवनाच्या तात्कालिक सत्याचे ते एक द्योतक मानले जाते. एकेकाळी झालेल्या अणुबॉम्ब स्फोटात होरपळून राख झालेली ही भूमी तितक्याच ताकदीने पुन्हा उभी राहिली, फिनिक्स पक्ष्यासारखी आणि नुसतीच उभी राहिली नाही, तर सर्व जगाला दाखवून दिली चेरी ब्लॉसमची जादू. जीवन बदलू शकते. जीवनात पुन्हा बहर येऊ शकतो. हार मानायची नाही. प्रयत्नांची जीत होतच असते. फक्त मनातून असा बहराचा ऋतु जपून ठेवता आला पाहिजे त्यासाठी ही चेरी ब्लॉसम म्हणजे साकुराची योजना. 

 १९७५ मध्ये जपानी संशोधकांनी सिद्धांत मांडला की, चेरीची झाडे ही हिमाचल प्रदेशात उगम पावली. मानवी संस्कृतीच्या आधी ती जपानमध्ये पोहोचली आणि पूर्वेकडे पसरली. त्यावेळी युरोपियन खंडाशी जपान जोडलेला होता. म्हणजे चेरीचा संबंध आपल्या देशाशी पूर्वापार जोडला गेला आहे. त्यांच्याकडे ती झाडे शतकानुशतके संकरीत केल्याने ती तिथे वाढली, फुलली इतकंच!


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.