त्यांनी जगण्यातले संघर्ष शिकवले

Story: सय अंगणाची |
12th April, 10:23 pm
त्यांनी जगण्यातले संघर्ष शिकवले

वेळेचं भान हरपून हातांची बोटे त्यांनी झिजवली. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत अहोरात्र कष्ट उपसले. गुरं-ढोरं, घर-संसार सांभाळण्यालाच त्यांनी आपले सर्वस्व मानले. आपल्याच माणसांकडून संघर्षाचे बाळकडू प्राशन केल्यावरच समजून अन् उमजून जाते. या गोष्टी शिकत गेले त्या माझ्या बालपणी जवळून ज्यांचं निरीक्षण, कष्ट‌, हालअपेष्टा सहन‌ करत जगणाऱ्या माझ्या समाजातील आई-बहिंणीकडून. 

थोरली आजी, वयल्या आकूचं जीवन पाहताना जगणं‌ असह्य कसे असू शकते हे सांगून गेले. जिच्या कुशीत नकळत्या वयात रडले, जिने नकळत्या वयात संकटांना प्रतिसाद देण्याची ताकद निर्माण केली, जिने स्वत:च्या नातवंडाएवढं आम्हाला जपलं ती आयुष्यातील थोर व्यक्ती म्हणजे थोरली आजी. जिनं दारी येणाऱ्या प्रत्येकाशी आपलेपणाचं नातं जोडलं, मायेचा हात सतत डोक्यावरून फिरवला ती वयली आकू. नकळत्या वयातील काही आठवांचे भास आजही अदृश्यपण दिसू लागतात. हमखासपणे तासनतास रडणं, न थांबणारे माझे हुंदके लक्ष्यात येताच गच्च मिठीत घेऊन, "लेका तुला शिकाचं हा..." म्हणत तिच्या डोळ्यातली आसवे माझ्यावर ओघळत, तिच्या स्पर्शाचा ओलावा आणि तिच्या कुशीतून निसटून हळूहळू का होईना सावरलेली मी. तिच्या "लेका" या शब्दाने मला कणखर बनवलं. 


एका घरात जन्माला आले, तरी वाड्यावरच्या या दोन घरातील व्यक्तींनी जगण्यातला संघर्ष शिकवला. थोरली आजीनं तर सुखाचा घास गोरगरिबांच्या मुखी पुरवला. वयात आलेल्या मुलीच्या अपघाती मृत्यूचे दु:ख आजीबरोबर आम्हा सर्वांनाच कितीतरी वर्षे वेदनेच्या जाळ्यात गुरफटवणारे होते. एका मुलीचा असा अकाली मृत्यू आजीसाठी असह्य होता त्यावेळी. तरीही इतर मुलांसाठी ती जगली. ऊन्हाच्या चटक्यात दिवसभर राबणाऱ्या आजीला बसण्याची उसतं‌ कधी भेटली नाही. कालांतराने घरातील‌ क्लेश‌, मुलांच्या भविष्याची चिंता या सगळ्या गोष्टींने‌ आजीने खूपच लवकर अंथरूण धरले. सर्वांची प्रेरणा असलेल्या आजीला मरणाला‌ही सामोरं एवढ्या भयाण परिस्थितीतून जावं‌ लागलं. तिचं मरण त्या लहान वयात पाहताना‌ माणसं कितीही चांगली असली तरी आपल्या सोबत सदैव नसतात हे आईने सांगितलेलं‌ वाक्य आजही खरं मानावं असं वाटत नाही. आजी अशिक्षित असली तरी तिला शिक्षणाची जाण होती. सकारात्मक विचार तिने झरीवरच्या पाण्यात कपडे धुताना दिले. पोफळीच्या बागयतीत सुपारी वेचताना‌ खुल्या आकाशाखालचे शिक्षण तिने मला दिले. आजही एखाद्या स्त्रीच्या मृत्यूची बातमी कानी पडली की हुबेहूब थोरल्या आजीचा भास होऊ लागतो. आजी लवकर गेली‌ खरी, परंतु तिने रुजवलेले संस्कार तिच्या पाचही मुलांनी अंमलात आणले. आजी गेली त्यादिवशी माटीवरचं जुनं घर सामसूम बनलं‌ ते कायमचंच. 

आजीनंतर वयल्या आकूकडे माझी पावलं जास्त वळली. घरात नवीन काही केलं की देवाला वाडी दाखवावी तसा माझ्या मुखी पहिला घास पडायचा. "बाबाच्या लेका" म्हणून हाक मारणाऱ्या आकूचा आवाज आजही एकटेपणा जाणवू लागला की साद घालू लागतो. मुलांसाठी गुरा-ढोरांच्या मागे धावणाऱ्या आकूने शेवटपर्यंत इलाजासाठी इस्पितळ गाठलंच नाही... सकाळी शाळेत जाताना डोक्यावरचा हात अन् दुपारी डोक्यावर हात घेऊन रडणारी तिची मुलं... नक्की काय झालं हे कळण्याअगोदर मला वेंगेंत घेऊन, "पिंक्या आई गेली" म्हणून रडणारी आकूची मोठी मुलगी. ९-१० वर्षांच्या वयात नेमकं‌ काय झालं ते मला कळलं नाही. परंतु मी कायमची हळवी बनले. 

आज एखादा प्रसंग आला तर थोरली आजी, वयल्या आकुसारखी मी कठोर होते परंतु तेचं संकटाचं सावट माझ्या माणसांवर आले तर मात्र नकळत आतून तुटत जाते. ते भयाण बालपण स्वत:कडे साठवून‌ ठेवलेल्या गोष्टी आठवू लागतात. माझ्या आदर्श ठरलेल्या अशिक्षित या दोन व्यक्तींनी नाती जपायला शिकवली, विचारांची देवाणघेवाण करायला शिकवले आणि माणूस म्हणून संकटासहित मला जगायला शिकवले. संकटं कितीही आली‌ तरी खचून न जाता संघर्ष करायचा. एक दिवस का असेना, संघर्षातलं जगणं नको असलं, तरी लाख मोलाचं असेल हे त्या दोघी सदैव सांगायच्या आणि‌ त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ आज समजतो. त्या दोघी‌ आज शरीराने माझ्याजवळ असत्या तरं‌ संस्कारांची शिदोरी अवतीभोवती माझ्याकडून कित्येकांपर्यंत तरी पोहचली असती. थोड्या वेळेसाठी का असेनात त्या माझ्या यशाच्या साक्षीदार मात्र नक्कीच आहेत.

एकीने जिद्दीने लढायला शिकविले तर 

दुसरीने व्यथा-वेदनांपासून सावरायला शिकविले...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.