डाॅम्निक डिसोझा, जुआन मास्कारेन्सकडून तडिपारीला उच्च न्यायालयात आव्हान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 12:49 am
डाॅम्निक डिसोझा, जुआन मास्कारेन्सकडून तडिपारीला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी : सडये-शिवोली येथील बिलिव्हर्स संघटना चालविणारा डाॅम्निक डिसोझा आणि जुआन मास्कारेन्स यांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तडीपार करण्याचा आदेश जारी केला होता. या संदर्भात मुख्य सचिव तथा अपीलीएट अॅथॉरिटी यांच्यासमोर दाखल केलेले आव्हान अर्ज २६ एप्रिल रोजी फेटाळल्यानंतर दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्यायालयाने नोटीस जारी करून पुढील सुनावणी बुधवारी, ८ रोजी ठेवली आहे.
सडये शिवोली येथील बिलिव्हर्स संघटना चालविणारे डॉम्निक डिसोझा काळ्या जादूचा वापर करून धर्मांतरण करत असल्याची तक्रार मूळ तामिळनाडूतील वडिवेल बी. (सध्या रा. कुर्टी-फोंडा) यांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर डॉम्निक याच्याविरोधात २००९ सालापासून पोलिसांत ९ तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात तीन गुन्हे धर्मांतराशी संबंधित आहेत. याची दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याला राज्यातून तर त्याच्या पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याची शिफारस उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या अनुषंगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांनी १४ मार्च रोजी आदेश जारी करून त्या दोघांना उत्तर गोव्यातून तडीपार केले. या आदेशाला दोघांनी मुख्य सचिव तथा अपीलीएट अॅथॉरिटीकडे आव्हान दिले होते. त्यानंतर एपीलीएट अॅथाॅरिटी काहीच करत नसल्यामुळे डिसोझा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाने मुख्य सचिव तथा अपीलीएट अॅथाॅरिटीला आव्हान अर्ज २६ एप्रिलपूर्वी निकाली काढा, असा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, वरील अॅथाॅरिटीने तडीपार आदेश रद्द करण्यास नकार दिला. या आदेशाला डिसोझा यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. 

हेही वाचा