हॉकीपटू ते व्यावसायिक : गायत्री हळबे

एक उत्कृष्ट हॉकीपटू, स्क्रीन प्रिंटींग व्यवसाय ते वाहन चालकाचा व्यवसाय असा कल्पनातीत प्रवास करून संसाराचा गाडा सुरळीत चालवणाऱ्या ‘नारी ते नारायणी’ अश्या गायत्री हळबे.

Story: तू चाल पुढं |
22nd March, 10:37 pm
हॉकीपटू ते व्यावसायिक : गायत्री हळबे

जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांवर मात करत पुढे जाणे हे यशस्वी होण्याचे लक्षण आहे. कितीही आणि कोणताही खडतर प्रसंग समोर उभा राहिला तरी त्यावर मात करण्याची क्षमता असली, की प्रसंग किती बाका असला तरी त्याचे भय वाटत नाही.

मडगावच्या गायत्री हळबे या एक उत्कृष्ट हॉकीपटू. कोल्हापूर येथील मदनमोहन लोहिया महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर या खेळात सहभाग घेतला होता. एक उत्कृष्ट हॉकीपटू म्हणून त्यांची गणना होती. ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ हा मंत्र तिचे लग्न करून देताना तिच्या आई वडिलांनी दिला आणि मग हा मंत्र लक्षात ठेवताना त्यांनी समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड दिले.

लग्न होण्याच्या आधी त्या स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करत होत्या. घरखर्चाला आपलाही हातभार लावावा, असे गायत्री यांना वाटत होते. पण सुरुवात कशी करायची ते त्यांना समजत नव्हते. मडगाव येथे पाच दिवसांचे प्रदर्शन चालू होते. तेथे त्यांनी काम केले. सुरुवातीला मिळालेले पाचशे रुपये त्यांना मोठा आनंद देऊन गेले कारण रोजच्या जेवणाला ज्या काही वस्तू हव्या होत्या, त्या त्यांनी आणल्या. काम केल्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव झाल्यावर त्यांनी मिलिंद अॅडव्हरटाईजमेंटकडे नोकरी केली. त्यावेळी त्यांना बाराशे रुपये पगार होता. त्यानंतर रोजंदारी पगाराची नोकरी धरली. तिथे दोन हजार रुपयांपर्यंत पगार मिळायचा. कसेतरी दोन अडीच वर्षे काम केल्यावर व्यवसायाची माहिती आणि भाषा अवगत झाली. यथावकाश त्यांच्या संसार वेलीवर फूल उमलले. मुलगा झाल्यावर आपल्या मुलासाठी खूप कष्ट करून त्याला मोठे करायचे हे स्वप्न त्यांनी उराशी धरले आणि मग गायत्री आणि त्यांचे पती सुहास हे दिवस रात्र मेहनत करू लागले. स्क्रीन प्रिंटींग कमिशनवर त्यांना काम मिळाले. हळूहळू व्यवसायात जम बसत गेला. त्यामुळे गावाकडील सासू सासर्‍यांनाही थोडीफार मदत करण्यास त्यांना शक्य होऊ लागले. त्यांची ही धावपळ पाहून सासरेही कौतुक करत असत. त्यांचे कौतुकाचे चार शब्द ऐकले की त्यांना अधिक हुरूप येई.

गेली बारा वर्षे गायत्री हा व्यवसाय करत असतानाच त्यांनी चारचाकी वाहन घेतले आणि शाळेतील मुलांना ने आण करण्याचे काम त्यांनी सुरू केले. आई बाबा आणि परमेश्वराची साथ त्यांना मिळत गेली आणि मग पुढे येणार्‍या प्रत्येक संघर्षावर त्यांनी सहज मात केली.

पुढे कोविड टाळेबंदीच्या आधी काही दिवस त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. मदतीचा हात काहीच नव्हता. तेव्हा लोकांच्या घरी जाऊन त्यांनी स्वयंपाकाची कामेही केली. कोविडच्या काळात  त्यांची प्रिंटींगची बारा तेरा वर्षाची पुंजीही संपली. हातात काहीच नव्हते, तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायचे त्यांनी ठरवले. रोजच्या जेवणाचे डबे द्यायचे काम त्यांनी सुरू केले. त्यामुळे घरचा खर्च सुटण्यास काही प्रमाणात मदत झाली. आपल्या गाडीमधून दुसर्‍यांनी केलेले जेवण हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचे काम त्यांनी सुरू केले. मग शाळा सुरू झाल्यावर त्यांनी सेव्हन सीटर गाडी घेतली. आणि त्या गाडीतून गायत्री स्थानिक विद्यालयांतील २१ विद्यार्थ्यांना ने-आण करायचे काम करत आहेत. आता याच कामाला त्यांनी सर्वस्व मानल्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचवण्याचे कामही आवडीने करतात. त्यांना त्या कधीच नाही म्हणत नाहीत. हे सर्व करत असताना त्या सकाळ संध्याकाळ स्वत: जेवण करून डबे पोचवण्याचे कामही करतात.  

आपले आई वडील किती कष्ट करत आहेत, याची जाणीव त्यांच्या मुलाला आहे व त्यांनी काढलेल्या या कष्टाचे चीज तो करेल अशी त्यांना आशा आहे.

गायत्री आज आपल्या पायावर समर्थपणे उभ्या आहेत. जीवनाने कितीही हताश करण्याचा त्यांना प्रयत्न केला तरी त्याला निर्भीडपणे तोंड देत त्यांनी आज आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.


कविता प्रणीत आमोणकर