‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीसाठी ३६ कोटींची निविदा

आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर होणार जारी


28th February 2024, 11:28 pm
‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीसाठी ३६ कोटींची निविदा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय महामार्गावर पणजी ते अनमोडपर्यंत असलेले १२ ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीसाठी ३६ कोटींची निविदा जारी झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाची ‘वर्क ऑर्डर’ जारी होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करणाऱ्या अभियंत्यांनी दिली.
पणजी ते अनमोड महामार्गावर १२ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केले जाणार आहेत. हे ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्यासाठीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंते सुमंत खंवटे यांनी दिली. बोरी येथील साईबाबा मंदिराजवळील तसेच १२ ब्लॅक स्पॉट दुरुस्त केले जाणार आहेत. मार्चमध्ये ‘वर्क ऑर्डर’ जारी केल्यानंतर मेपर्यंत किमान निम्मे स्पॉट दुरुस्त होतील. राष्ट्रीय महामार्गावर आणखी ब्लॅक स्पॉट असू शकतात. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रियाही सुरू केली जाईल. सध्या शोधलेल्या १२ ब्लॅक स्पॉटांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल.
राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघात कमी करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी बैठक घेतली. या बैठकीत ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्याबाबत चर्चा झाली. राज्यातील जिल्हा आणि अन्य रस्त्यांची दुरुस्ती सुरूच असते. रस्त्यांवर धोकादायक क्षेत्र तयार होते. ते दुरुस्त करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी ‌माहिती अधीक्षक अभियंते अॅलन पेरेरा यांनी दिली.