मडगाव : काही विमान कंपन्यांना ८.३० ते १२.३० या वेळेत विमान उड्डाणासाठी अडचण होत असल्याने अशा विमान कंपन्यांनी दाबोळी विमानतळाऐवजी मोपा विमानतळावर सेवा सुरू केल्यास त्याला विरोध नसेल. दाबोळी विमानतळ बंद होणार नाही, कारण त्यासाठी २५० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेला आहे. याशिवाय इतर कारणास्तव विमानसेवा स्थलांतरित करण्यात येत असल्यास केंद्र सरकारकडून त्यात हस्तक्षेप व्हावा, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी म्हटले आहे.
खासदार सार्दिन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वरील मत मांडले आहे. राज्यातील वास्को, सावर्डे येथे नवे रेल्वेस्थानक व सां जुझे द अरियाल परिसरात अंडरपास बांधणे यांसह पाच कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या सुविधा देण्यात येत असल्या तरीही राज्याला रेल्वे दुपदरीकरणाची गरज नाही. कोळसा वाहतुकीमुळे राज्यातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे माजोर्डा ते वास्को रेल्वे दुपदरीकरण केले जाऊ नये, असे सार्दिन म्हणाले.
स्मार्ट सिटीमधील सर्व रस्ते तीन महिन्यांच्या कालावधीत सुस्थितीत आणण्याच्या सूचना न्यायालयाकडून करण्यात आलेल्या आहेत. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना हाच गोवा दाखवणार का, असे विचारणा करत पणजीतील रस्ते व्यवस्थित करत पणजीवासीयांनाही दिलासा द्यावा. कोणताही पक्ष सत्तेत येऊ देत. त्याने जनतेसाठी काम करावे, असे सार्दिन यांनी सांगितले.
घर किंवा आस्थापनांच्या बाजूला धोकादायक झाडे असल्यास ती तोडण्याची प्रक्रिया वन खात्याने सुटसुटीत करावी. परवानगी मागण्यात आल्यावर तत्काळ पाहणी करून झाड तोडण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे. तसेच काहीजणांना आर्थिक अडचणींमुळे झाडे तोडावी लागतात, ती तोडण्याची परवानगीही आवश्यक त्या प्रक्रियेनंतर द्यावी. राज्यातील वनाचे, जंगलांचे नुकसान भू रुपांतरांमुळे झालेले आहे. लोकांना परवानगी देताना अडचणी आणल्या जाऊ नयेत, असे खासदार सार्दिन यांनी सांगितले. राज्यात संजीवनीच्या जागी इथेनॉल प्रकल्प नको तर साखर कारखाना शक्य तेवढे प्रयत्न करून लवकर सुरू करावा. राज्यात रेती उपसा कायदेशीररीत्या सुरू करण्यात यावा, असेही ते म्हणाले.
आपला प्रचार सुरूच : सार्दिन
काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यास उशीर झाला, असे आपणास वाटत नाही. काँग्रेसकडून आपणास उमेदवारी दिली गेल्यास त्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे. आपण केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. केवळ उमेदवारी जाहीर होण्याचे बाकी असल्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले.