संशयितांचे १३.७५ कोटी गोठवले : केवळ ०.०६ टक्के पैसे मिळाले परत
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रिपोर्टिंग पोर्टल सुरू झाल्यापासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत गोव्यातून सायबर फसवणुकीच्या ६,०५२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यातून तब्बल १४९.०६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. गोव्यातून आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना पोलिसांना संशयितांच्या बँक खात्यांतील १३.७५ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे. असे असले तरी आतापर्यंत तक्रारदारांना केवळ ९.३८ लाख रुपये परत करण्यात यश आले आहे. रक्कम परत करण्याची टक्केवारी ०.०६ इतकी कमी आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार सदानंद शेट तानावडे यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वाधिक ४.२७ लाख तक्रारी आल्या आहेत. यातून ५ हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. यातील ६२१ कोटी रुपये गोठवण्यात, तर सुमारे ९.१८ कोटी रुपये तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरातमधील ३.६७ लाख तक्रारीतून २,७४५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील ५५६ कोटी रुपये गोठवण्यात, तर सुमारे १०.३१ कोटी रुपये तक्रारदारांना परत करण्यात यश आले आहे.
उत्तरात म्हटले आहे की, राजस्थानमधून सायबर फसवणुकीच्या २.६७ लाख तक्रारी आल्या आहेत. यातून १,५०९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. यातील १८३ कोटी रुपये गोठवण्यात, तर सुमारे ५.४ कोटी रुपये तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले. सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने पोर्टलशिवाय १९३० ही हेल्पलाइन सुरू केली आहे. राष्ट्रीय सायबर फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबने आतापर्यंत विविध राज्य सरकारांना ११ हजार ८३५ सायबर गुन्हे प्रकरणांत मदत पुरवली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशभरातील ८० हजार पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
८ लाखांहून अधिक संशयित
उत्तरात म्हटले आहे की, केंद्र सरकारने बँक आणि इतर वित्तीय संस्थांच्या सहाय्याने सायबर फसवणूक करणाऱ्या संशयितांची यादी तयार केली आहे. यामध्ये ८ लाखांहून अधिक संशयित आणि २० लाखांहून अधिक खात्यांची यादी तयार केली आहे. याद्वारे आतापर्यंत २,८८९ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे.
संपूर्ण देशातून ३८.२२ लाख तक्रारी
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशातून सायबर फसवणुकीच्या ३८.२२ लाख तक्रारीतून ३६ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिसांना संशयितांच्या बँक खात्यांतील ४,३८० कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे. आतापर्यंत तक्रारदारांना केवळ ६०.५१ कोटी रुपये परत करण्यात यश आले आहे.
गोव्याला १.९२ कोटींचा निधी
लोकसभेतील अन्य एका प्रश्नाच्या उत्तरानुसार, केंद्र सरकारने महिला आणि बालकांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. याद्वारे गोव्याला आतापर्यंत १.९२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या पोर्टलवर आणि बालकांच्याविषयी सायबर गुन्हांच्या तक्रारीदेखील घेतल्या जात आहेत.