८,०५२ शेतकऱ्यांना फायदा; राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्र सरकारच्या ‘गोकुळ मिशन’ उपक्रमाअंतर्गत गेल्या तीन वर्षांत राज्यातील ३७,०५५ गायी, म्हशींना कृत्रिम गर्भधारणा झाली असून, त्याचा ८,०५२ शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे केंद्रीय पशुपालन आणि पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत पशुपालन आणि पशुसंवर्धन मंत्रालयाने काही वर्षांपासून गायी, म्हशींच्या कृत्रिम गर्भधारणा किंवा रेतनासाठी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन (एआय) सुविधा उपलब्ध केली आहे. तीन वर्षांत गोव्यासह देशभरातील सुमारे १२.३५ कोटी गायी, म्हशींना कृत्रिम गर्भधारणा झाली असून, त्याचा सुमारे ५.२२ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे मंत्री सिंग यांनी उत्तरात म्हटले आहे.
दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांच्या गायी, म्हशींचे संगोपन तसेच त्यांच्या गर्भधारणेसंदर्भात राष्ट्रीय गोकुळ मिशन उपक्रमाअंतर्गत मंत्रालयाने अनेक सकारात्मक पावले उचलली असून, त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे मंत्री सिंग यांनी नमूद केले आहे.
अशी असते कृत्रिम गर्भधारणेची पद्धत...
१. सिद्ध वळूची वीर्यमात्रा शास्त्रीय पद्धतीने संकलित करून वीर्याची शीत तापमानाला साठवणूक करून माजावर आलेल्या गायी-म्हशींच्या गर्भाशयात ती नळीद्वारे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सोडली जाते.
२. नैसर्गिक रेतनातून एका वेळी एकच गाय किंवा म्हैस गाभण राहू शकते. परंतु, जातिवंत वळूपासून एकाच वेळी वीर्यसंकलन केल्यानंतर त्यापासून शेकडो रेतमात्रा तयार केल्या जातात.
३. या रेतमात्रा माजावर आलेल्या गायी-म्हशींमध्ये योग्य वेळी तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत भरवून घेतल्या जातात. यामुळे वळू संगोपनाचा अतिरिक्त खर्च टाळता येतो. माजावर आलेल्या गायी-म्हशींना वळूच्या शोधात दूरवर न्यावे लागत नाही.
४. अपंग दुर्बल गाई, म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करता येते. यामुळे गायी, म्हशींना जननेंद्रियांचे आजार होण्याची शक्यता फार कमी होते.
५. गायी, म्हशी २१ दिवसांनी माजावर येत असतात. व्यायलेली जनावरे ४५ ते ६० दिवसांनी माजावर येत असतात. गायीचा माज १८ ते २४ तास असतो, तर म्हशींचा माज २४ ते ३० तासांपर्यंत टिकतो. माजाचा मध्य ते उत्तरार्ध या स्पष्ट माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन केले जाते.
६. सकाळी माजावर आलेल्या गाई, म्हशींमध्ये सायंकाळी, तर रात्री माजावर आलेल्या गाई, म्हशींमध्ये पहाटे कृत्रिम रेतन केले जाते.