सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी पीएमार्फत एका मंत्र्याला २० लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात (एसीबी) तक्रार दाखल केली होती. त्यावर एसीबी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसीबीचे अधीक्षक आणि निरीक्षक यांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी होणार आहे.
या प्रकरणी काशीनाथ शेट्ये, इनासिओ परेरा, रामचंद्र मांजरेकर, जॉन नाझारेथ, प्रेमेंद्र वेर्णेकर आणि कृष्णा पंडित या सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी एसीबीचे अधीक्षक आणि निरीक्षक यांना प्रतिवादी केले आहे. त्यानुसार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी ४ मार्च रोजी भाजप पदाधिकाऱ्यांसह मंत्री व आमदारांसोबत चर्चा केली होती. संतोष यांना भेटून परत जात असताना माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. काम पूर्ण होण्यासाठी एका मंत्र्याच्या खासगी सचिवाला (पीए) आपण २० लाख रुपये दिल्याचा दावा त्यांनी केला होता. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकात (एसीबी) तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. एसीबी काहीच करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसीबीचे अधीक्षक आणि निरीक्षकांना नोटीस बजावली आहे.