रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढच; गोमंतकीयांत चिंता
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कॅन्सर, मधुमेह, किडनी, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या रुग्णांची राज्यात संख्या दरवर्षी वाढतच आहे. सर्वाधिक फोफावत असलेल्या कॅन्सर आणि किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेले सुमारे तीन रुग्ण दररोज गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि इतर इस्पितळांमध्ये उपचारांसाठी जात असल्याचे उघड झाले आहे.
कॅन्सर, किडनीसारख्या दुर्धर आजारांवर संशोधन करण्यासाठी राज्य सरकारने टाटा मेमोरियल इस्पितळ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. या पार्श्वभूमीवर, अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त होत असलेल्या रुग्णांचा आढावा घेतला असता, सर्वच प्रकारच्या रुग्णांमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात राज्यात गोमेकॉ आणि इतर इस्पितळांमध्ये कॅन्सरबाबत पाच हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतल्याचे समोर आले. त्यातून राज्यात प्रत्येक दिवशी कॅन्सरच्या संशयाने तिघेजण उपचारांसाठी इस्पितळांत जात असल्याचे सिद्ध होते.
मधुमेही रुग्णांबाबत गोवा देशात प्रथम आहे. २६ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. राज्यात दररोज दोन रुग्ण मधुमेहाच्या उपचारांसाठी इस्पितळांत जात आहेत. २० टक्के लोक मधुमेह होण्याच्या अगोदरच्या पातळीवर आहेत. मधुमेहामुळे किडन्या निकामी होणाऱ्यांची संख्याही प्रत्येकवर्षी वाढत आहे. २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. दररोज तीन ते चार रुग्ण किडनीसंदर्भातील आजारांबाबत उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे. कॅन्सर, मधुमेह, किडनीप्रमाणेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या कृतिदलाचा अहवाल लवकरच सादर
राज्यात वाढत असलेल्या दुर्धर आजारांबाबत संशोधन करण्याची गरज असल्याच्या विषयावर विधानसभेच्या गत पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली होती. त्यातून किडनीचे आजार होणाऱ्यांची संख्या काणकोणमध्ये सर्वाधिक असल्याचा विषयही चर्चेत आला होता. त्यासंदर्भात अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी सरकारने तत्काळ आरोग्य खाते, गोमेकॉ आणि गोवा विद्यापीठातील तज्ज्ञांचा समावेश असलेले कृतिदल स्थापन केले होते. या कृतिदलाने अभ्यास सुरू केला असून, त्याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला देण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.