विदेशात शिक्षणासाठी पाच वर्षात १२७ कोटींचे कर्ज

गोव्यातील ८६३ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ


12th March, 11:19 pm
विदेशात शिक्षणासाठी पाच वर्षात १२७ कोटींचे कर्ज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बँकांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत गोव्यातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी एकूण १२७ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. याचाच अर्थ या बँकांनी गोव्यात वर्षाला सरासरी २५.४ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज दिले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार जे. बी. माथेर हिशम यांनी अतरांकित प्रश्न विचारला होता.
उत्तरात म्हटले आहे की, भारतीय बँक संघटना विदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कर्जांची माहिती गोळा करते. यामध्ये केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची माहिती जमा करण्यात आली आहे. यानुसार गोव्यातील सार्वजनिक बँकांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान १८१.८२ कोटी रुपयांची कर्जे मंजूर झाली होती. प्रत्यक्षात एकूण ८६३ बँक खातेधारकांना १२७ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. या कालावधीत संपूर्ण देशात अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी १.७७ कोटींचे कर्ज वितरीत झाले.
देशाचा विचार करता पाच वर्षांत केरळमधील ६६ हजार १५९ विद्यार्थ्यांना तब्बल ७,६१९ कोटी रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. यानंतर महाराष्ट्रातील ३९ हजार ९०२ विद्यार्थ्यांना ६,१५८ कोटी; आंध्र प्रदेशातील ४० हजार ११४ विद्यार्थ्यांना ५,१५८ कोटी रुपये कर्ज देण्यात आले.
देशभरातील ३.४० लाख विद्यार्थ्यांना कर्ज
वरील कालावधीत देशभरातील ३ लाख ४० हजार ८११ विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४२ हजार ८९३ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत कले आहे.