दोन महिन्यांत सर्वच पंचायती ‘ऑनलाईन’!

संचालक सिद्धी हळर्णकर यांची माहिती


12th March, 11:07 pm
दोन महिन्यांत सर्वच पंचायती ‘ऑनलाईन’!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पुढील दोन महिन्यांत राज्यातील सर्वच पंचायती ऑनलाईन होणार आहेत. गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडून (जीइएल) यासंदर्भातील काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी बुधवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली​.
राज्यातील १९१ पंचायतींपैकी केवळ ९३ पंचायतींमध्येच ऑनलाईन पेमेंटची सुविधा असल्याचे लोकसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून समोर आले होते. याबाबत हळर्णकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही हे मान्य केले. सर्वच पंचायतींचा कारभार पारदर्शक करण्याच्या हेतूने खात्याने पंचायतींचे कर स्थानिकांना ऑनलाईन पद्धतीने भरता यावे, आवश्यक दाखले त्यांना ऑनलाईन मिळावे, कागदपत्रे तसेच विविध कर भरण्यासाठी त्यांना वारंवार पंचायतींत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी पंचायतींचा कारभार ऑनलाईन करण्याची प्रक्रिया खात्याने काही महिन्यांपासून सुरू केली आहे. याबाबतचे कंत्राट गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला देण्यात आले असून, त्यांच्याकडून हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्वच पंचायतींचा कारभार ऑनलाईन होईल, असेही हळर्णकर यांनी नमूद केले.
दरम्यान, ग्रामीण भागांतील पंचायतींचा कारभार ऑनलाईन करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात इंटरनेटचे जाळेही विस्तारण्याचे प्रयत्न सरकारने युद्धपातळीवर सुरू केले आहेत.                  

हेही वाचा