हडफडेतील छाप्यात नायजेरियनाकडून ७४.७५ लाखांचे ड्रग्ज जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th February, 12:35 am
हडफडेतील छाप्यात नायजेरियनाकडून ७४.७५ लाखांचे ड्रग्ज जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) हडफडे येथे छापा टाकून इनोसेंट ओरेझुवानू अनारमेम (५६) या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ७४.७५ लाख रुपये किमतीचे ४८० ग्रॅम कोकेन, १५ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि २५० ग्रॅम चरस जप्त केले.

अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हडफडे येथे एक विदेशी नागरिक अमली पदार्थ तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीचे अधीक्षक बाॅसिएट सिल्वा आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर, पोलीस हवालदार प्रमोद कळंगुटकर, कॉ. नीतेश मुळगावकर, संदेश वळवईकर, मंदार नाईक, लक्ष्मण म्हामल, मकरंद घाडी, अमित साळुंके, कुंदन पटेकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने शनिवार २४ रोजी दुपारी ३.४५ ते सायंकाळी ७.१५ दरम्यान सापळा रचला. याच दरम्यान एक नायजेरियन नागरिकाची एएनसीने चौकशी केली असता, तो इनोसेंट ओरेझुवानू अनारमेम (५६) असल्याचे समोर आले. पथकाला त्याच्याकडून ७२ लाख रुपये किमतीचा ४८० ग्रॅम कोकेन, १.५० लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम एक्स्टसी पावडर १.२५ लाख रुपये किमतीचे २३० ग्रॅम चरस सापडले. ड्रग्जची किमत ७४.७५ लाख रुपये आहे.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गारुडी यांनी संशयित इनोसेंट याच्या विरोधात अमलीपदार्थविरोधी कायद्याच्या कलम २० (बी)(ii)(बी), २१ (सी) आणि २२(सी)अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला रविवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, सहा दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

इनोसेंटवर आतापर्यंत ४ गुन्हे दाखल

संशयित इनोसेंट ओरेझुवानू अनारमेम याच्या विरोधात हा चौथा आणि ड्रग्ज तस्करीतील पहिला गुन्हा आहे. १ नोव्हेंबर २०१३ रोजी नायजेरियन नागरिकांनी पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून राडा केला होता. या प्रकरणात त्याचा सहभाग असल्यामुळे त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बेकायदेशीर वास्तव केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याच दरम्यान त्याला डिटेनशन केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनसीने मागील दोन महिन्यांत चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यात १.५८ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यात ४२ किलो गांजा, ६.५ किलो चरस, ४८० ग्रॅम कोकेन, ११५ ग्रॅम एक्स्टसी पावडर व इतर ड्रग्जचा समावेश आहे.