वंडरफूल दूध (भाग २)

Story: स्वस्थ रहा मस्त रहा |
17th February, 10:29 pm
वंडरफूल दूध (भाग २)

मागच्या रविवारी आपण दूधाचे फायदे, दूध कोणी प्यावे कोणी पिऊ नये इत्यादि विषय वाचून आपल्या मित्र मैत्रिणींनाही माहिती दिली असेल. दूध पिण्याविषयी अजून माहिती मिळविण्याची उत्सुकता ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असेल. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. 

दूधात काय घालून प्यावे?

ताजे गाईचे दूध शक्यतो काहीही न घालता पिणे सगळ्यात जास्त चांगले. पण मला माहीत आहे, काहींना दूधाची चव आवडत नाही. त्यांनी दूधात खडीसाखर घालून प्यावी. 

चमचाभर साजूक तूप सुद्धा दूधात घालू शकता. 

ज्यांना दूध खूप आवडतं पण दूध प्यायल्याने सर्दी होते त्यांनी दूधात चिमुटभर सुंठ किंवा मिरपूड किंवा हळद घालून दूध प्यावे. 

दूध ताजे व गरम करून प्या. फ्रीज मधून काढलेले थंड दूध पिऊ नये.

दूधाबरोबर कोणते पदार्थ खाऊ नये? 

१. मीठ - मीठ घातलेले कोणतेही पदार्थ उदा. भात, भाकरी, चपाती, शेव, चिप्स, कॉर्न फ्लेक्स, सिरीयल्स, पाव भाजी आणि ज्या गोष्टींची नेहमी जाहिरात दाखवली जाते - पहले ट्विस्ट करो, लिक करो, डंक करो असे पदार्थ...

लेकीन ध्यान रखो दूध में कुछ भी बिलकुल डंक ना करो...म्हणजेच दूधात मीठ असलेला कोणताही पदार्थ बुडवून खाऊ नका. 

२. आंबट पदार्थ/फळं - दूध आणि फळं एकत्र खाऊ नये. आठवा बरं असे कोणते पदार्थ आहेत? मिल्क शेक, बनाना मिल्क शेक, चिकू शेक, पपाया शेक इ., फ्रूट कस्टर्ड, केळीचे शिकरण. 

पण गोड आंबा आणि दूध हे मात्र एकत्र खाऊ शकता पण आंबा मात्र चांगला पिकलेला आणि गोड हवा हं!

३. मासे/ इतर मांसाहारी पदार्थ - जेवणात मासे खाल्ले असतील किंवा चिकन, मटण सारखे पदार्थ असतील तर त्यासोबत किंवा असे मांसाहारी जेवण जेवल्यावर लगेच दूध पिऊ नये. 

ब्रेकफास्टला उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट ब्रेड आणि दूध असे एकत्र खाल्ले जाते. तुम्हीही अशी चूक करत असाल तर लगेच बंद करा. 

४. नाश्ता किंवा जेवणाबरोबर दूध पिऊ नये. कारण या पदार्थांमध्ये मीठ असते, काही पदार्थ आंबट असतात. अपचन, गॅसेस सारखे अनेक रोग त्यामुळे होऊ शकतात. 

तुम्ही म्हणाल यातील काही पदार्थ तर आम्ही खूपदा दुधासोबत खाल्ले आहेत पण आम्हाला काही त्रास झाला नाही. पण असा विरुद्ध आहार म्हणजे दूध आणि आंबट किंवा मीठ घातलेले, मांसाहारी पदार्थ हे स्लो पॉयजन सारखे काम करतात म्हणजेच हे विषारी पदार्थ हळूहळू त्वचारोग - सोरायसिस, पित्त उठणे, फंगल इन्फेक्शन असे आजार निर्माण करतात. 

त्याचप्रमाणे बाजारात मिळणारे चॉकलेट किंवा इतर फ्लेवर्सचे दूधात घालायचे पावडर ज्यांच्या सतत जाहिराती दाखवल्या जातात. यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते, प्रिझरव्हेटीव असतात जे आरोग्यासाठी चांगले नाहीत.  त्यामुळे तुम्ही जर रोज दूध पित असाल किंवा आजपासून पिणार असाल तर दूधासोबत काय काय खावे व काय खाऊ नये याचा छान चार्ट बनवा आणि तुम्हाला दिसेल तिथे चिकटवा म्हणजे तुमच्या लक्षात या गोष्टी नेहमी राहतील. वंडरफुल दूध एन्जॉय करा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य