हक्काचं भावंड

Story: छान छान गोष्ट |
17th February, 10:27 pm
हक्काचं भावंड

चंदू व साऊची आज सकाळपासनं मारामारी सुरू होती. स्वैंपाकघरातनं आईनं सज्जड दम भरला, "चंदू, साऊ कित्ती आरडाओरडा आणि हे रे काय, एकमेकांना बोचकारताय!" साऊला चंदूशी लढणे जमेना तसा तिनं मोठ्ठा आलाप लावला. रडत होती पण डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता. चंदूवर आईचा फटका पडला कारण त्याने बोचकारताना साऊचं रक्त काढलं होतं. "थांब चंद्या, बघच आता. बाबा येऊ देत संध्याकाळी. तुझी हजेरी घेते चांगली." आईने चंदूला दरडावलं.

"तू नं आई, नेहमीच या सावडीमावडीचीच बाजू घेतेस. हिने बघ ना माझ्या निबंध वहीच्या पानावर रेघोट्या ओढल्यान." चंदूने मुसमुसत आपली बाजू मांडली. "आई, मला वातलं ती दादूची लफ वईय." मान गोलगोल हलवत साऊ म्हणाली. "जरा शांत रहा तुम्ही दोघं. साऊ तो खोडरबर आण इकडे. मी देते खोडून." आणि आईने चंदूच्या वहीची पानं पहिल्यासारखी करून दिली.

आज शाळेत बाईंनी निबंध लिहायला दिला... 'माझं भावंड'.

कुणी आपल्या मोठ्या बहिणीबद्दल तर कुणी लहान भावाबद्दल लिहू लागलं. जे एकुलते एक होते ते बाईंच्या सूचनेनुसार आपल्या चुलत, मामे भावंडाबद्दल आठवून आठवून लिहू लागले. चंदूच्या डोळ्यासमोर त्याची इटुकली बहीण साऊ आली. अगदी आईसोबत इस्पितळात असतानाची तिची तान्हुली छबी, बारसं झाल्यानंतर कधी झोळीत तर कधी पाळण्यात असतानाची, मग साऊ हळूहळू कशी मान धरू लागली, रांगत रांगत आपल्या मागे मागे फिरू लागली. चक्क पहिला शब्द दद्दा दद्दा म्हणू लागली. 

शाळेच्या बसमधून उतरताना आईच्या कडेवर थाटात बसून बसला हात दाखवत 'दद्दा ये दद्दा ये' करणारी नि उतरलं की मिठी मारणारी... किती भरभर मोठी झाली साऊडी... आता तर बालवाडीत जाते नि कोणाच्या वाढदिवसाला गोळी, खाऊ मिळाला तर एकटी एकटी न खाता दादूसाठी घेऊन येते. थोडी वेडीच! परवा तर ऊसाच्या रसातला बर्फ घेऊन आली होती, दादू शाळेतून आला की द्यायला आणि मग त्या ओल्या खिशातला बर्फ कुठे सांडून गेला म्हणत रडत बसली होती. काल नफ्यातोट्याचं गणित सारखं सारखं चुकतं म्हणून बाबा हातावर छडी मारणार होते तर दादूच्या मांडीवर येऊन बसल्या साऊबाई नि "पलत ना चुतनार गनित दादूचं" म्हणत दादूची बाजू घेऊ लागल्या. किती नं काय काय लिहू असं चंदूला झालेलं. 

चंदूच्या बाजूला बसलेला मंथन चंदूच्या भरलेल्या पानाकडे पहात म्हणाला, "चंदू, किती भरभर सुचलं रे तुला. माझी आत्तेबहीण वर्षातनं दोनदा येते. तिच्याबद्दल काय एवढं लिहिणार! तुझं बरंय तुला हक्काचं भावंड आहे." मंथनचं हे म्हणणं चंदूला पटलं. त्याने होकारार्थी मान हलवली. चंदूचा निबंध बाईंनी नुसता वाचूनच दाखवला नाही, तर स्पर्धेसाठी निवडलेल्या निवडक निबंधांत त्याची वर्णी लागली.

चंदूची स्वारी अगदी खुशीत घरी आली. "दादूच्या वह्यांना हात लावायचा न्नाssई. त्यावर लेदोत्या मालायच्या नाssईत." साऊ आपला पेटीफ्रॉक हाताने फिरवत गात होती. साऊला उचलून घेत चंदू म्हणाला, "साऊडी माझी लाडुली छकुली. तुझ्यामुळे आज मी एवढा सुंदर निबंध लिहू शकली. आई तुला माहितीय, आज बाईंनी माझ्या निबंधाचं खूप कौतुक केलं. मी किनै 'माझं भावंड' या निबंधात, साऊ आपल्या घरात आल्यापासनंच्या गोड गोड आठवणी लिहिल्यात." इतक्यात साऊचंदूचे बाबा आले, कार्यालयातनं.  "काय मग भरपूर लाड चाललेत बहिणाबाईचे," बाबा असं म्हणताच दोन्ही गालांवर हात ठेवून साऊटली खुदकन हसली. तिचे डोळे अगदी माणकासारखे चमकले.

आई मात्र बाबांसाठी चहा ठेवताना मनाशी म्हणत होती, "काय ही भावंड. कधी भांडतील नि कधी एक होतील काही थांगपत्ता लागायचा नाही.”


गीता गरुड