दुधातला मासा...

Story: मिश्किली |
17th February, 10:05 pm
दुधातला मासा...

कृष्णाकाठचं आंबवडे तीन साडेतीन हजार लोकवस्तीचं मोठं तालेवार गाव. काळ नव्वदीचा असावा. गावाला ऊसाच्या शेतीनं बऱ्यापैकी घेरलं होतं. छोट्यातला छोटा शेतकरीही एकरकमी पैशाच्या हव्यासानं वर्षभर राबत होता. गावात दुधदुभत्याची कमी नव्हती. शेतीला पूरक म्हणून अर्ध्या अधिक लोकांच्या घरी एखाद दुसरी गाई म्हैस असायचीच. घरची गरज भागवून उरलेलं दूध कारभारणी सरळ दूधवाल्याला घालायच्या. अडीनडीला पोराठोरांच्या शाळेला कधीमधी बटवा रिकामा करत असत. ज्यांच्या घरी दुधदुभतं नव्हतं ते रोजचा रतीब लावून गरजेपुरतं दूध घेत असत. एकूणच सगळं गाव स्थिर होतं, बरचसं सधन होतं शिवाय वैचारिक मतभेद असले तरी टोकाचं वैर कोणी ठेवत नव्हते. 

वीस पंचवीस वर्षांपासून गावात दूध संकलन करण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला होता. हजारो लिटर दुधाचं संकलन होऊनही गावात डेअरी मात्र नव्हती. सहा सात किमी वर असलेल्या बाजारपेठेच्या कुसुरमध्ये दोन तीन चांगल्या नावाजलेल्या डेअरी होत्या. तिथेच गावात जमा झालेलं सगळं दूध घातलं जायचं. शिवाय अंबवड्यात ज्यांना ज्यांना रतीबाचं दूध चालू होतं त्यांच्यासाठी रोजचं दूध घेऊन दूधवाला घरी येत असे. ठरलेल्या मापातून खास दुधासाठी राखून ठेवलेल्या पातेल्यात दूध ओतलं की तो मोकळा. 

सुताराचा हिंदुरावही असाच आपल्या चरितार्थासाठी गेली वीस वर्षे दूध संकलनाचं काम करत होता. त्याचं निम्मं आयुष्य याच धंद्यात गेलं होतं. मूळ सुतारकीही गरजेपुरती चालू होतीच. गावगाडा चालवणारा सगळा बलुत समाज गावाच्या एकाच टोकावर अगदी ग्रामदैवताच्या कुशीत नांदत होता. हिंदुरावांच्या नेहमीच्या गिऱ्हाईकात वाण्याचे विश्वास अप्पाही होते. किराणा दुकान चालवून आपला चरितार्थ चालवणारे अप्पा गावात नावाजलेले व्यक्तिमत्त्व. शब्दाला जगणारे. विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध होते. हिंदुरावने कुसुरच्या डेअरीमधून आणलेल्या दुधाचा अप्पाही एक मोठं गिऱ्हाईक होते. अप्पांच्या घरी दहा पंधरा मंडळींचा गोतावळा. जमीन नसल्याने सगळे दुकानाच्या जीवावर चाललेलं. लिंगायत असल्याने घरी कडक सोवळं पाळलं जात असे. अभक्ष्य भक्षण तर दूरच पण त्याचा सुगावा लागला तरी अवघं कुटुंब चार हात दूर व्हायचं. 

कुसुरवरून येताना वाटेत फुललेली शेतीभाती अंबवड्याच्या अन कुसुरच्या प्रगतीचा रूपक होते. दोन्ही गावाच्या मध्यावर एक स्वच्छ नितळ पाण्याचा ओढा होता. आजूबाजूला अंबवड्यातल्या चव्हाण कुटुंबाची शेती असल्याने त्या ओढ्याला 'चव्हाणाचा ओढा' असं नाव पडलेलं. पाणी इतकं स्वच्छ की शेतात काम करणारी मंडळी बिनधास्त ते प्यायची. ओढ्यात कमरे इतके खोलीचे चार दोन डोह असल्याने ऐन उन्हाळ्यातही पाणी तग धरून राहायचं. डोहात बोटभर जाडीचे अन तितक्याच लांबीचे भरपूर मासे असत. पांढरे शुभ्र, चमकदार मासे उन्हाच्या तिरपीने चमकून उठत असत. हिंदुराव रोजच्या रोज आपल्या सायकलवर दोन्ही बाजूला दोन दुधाच्या किटल्या अडकवून या ओढ्यातूनच ये-जा करायचा. इथे घटकाभर थांबून थंडगार पाण्याचा शिडकावा तोंडावर मारून, तंबाखुची चिमट मळून ओठाखाली धरली की रोजच्या दुधाचा हिशेब लावण्यात त्याचा तासभर जायचा. तो व्यवहाराला चोख होता, पैशाचा पक्का होता फक्त दुधात पाणी मिसळायची त्याची एक जुनी खोड होती. रोजच्या हिशेबात घोळ व्हायचा दिसला की ओढ्यातलं स्वच्छ शुद्ध थंडगार पाण्याचे दोन चार तांबे दुधाच्या किटल्यांत ओतून हिशेबाची बेजमी करत असे. 'कोणाला काय कळतंय' म्हणून तो खूश व्हायचा. रोजच्या दुधाचा रोजचा हिशेब पक्का लागल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हती. 

असाच एक दिवस हिशेब लावता लावता नेहमीप्रमाणे त्याच्या दुधात पाच सात लिटरचा कमी जास्त घोळ दिसू लागला. पैशाचा हिशेब करता तोटा बराच दिसत होता. आता हे गणित बरोबरीत आणलं पाहिजे म्हणून त्याने हँडलला अडकवलेल्या तंगसाच्या पिशवीतला तांब्या काढला. बरोबर एक लिटर मापाचा तो तांब्या त्यानं ओढ्याच्या नितळ डोहात बुडवून नितळवून भरून काढला, दोन चार वेळा त्यात डोकावून पाहिलं. सगळं 'ठीकठाक' असल्याची खातरजमा झाल्यावर  सायकलच्या डाव्या बाजूच्या किटलीत ओतला. असेच आणखी दोन तांबे त्याच किटलीत रिकामे केले. एकवार दूध चांगलं ढवळलं अन झाकण लावून किटली बंद केली. हाच प्रकार उजव्या बाजूच्या दुसऱ्या किटलीतही केला. दोन तांबे किटलीत रिकामे केल्यावर नेमक्या तिसऱ्या तांब्यात पाण्याबरोबर दोन पांढरेशुभ्र मासे आले. आधीच पाच तांबे निरखून तो पाण्याच्या शुद्धतेबाबत आश्वस्त झाला होता. त्यामुळे त्याने तिसरा तांब्या न निरखता तसाच किटलीत रिकामा केला. बिचारे मासे सळसळत दुधाच्या किटलीत बंदिस्त झाले. 

हिंदुराव तसाच उठला अन अंबवड्याच्या दिशेने सायकल हाकू लागला. दुधाचा आजचा त्याचा हिशेब पक्का झाला होता. गावात येतायेताच रतीबाच्या कुटुंबांना तो मापानुसार दूध घालू लागला. भिवा माळी, रामा न्हावी, अंतू परीट, यादवांचा तुका, सुताराचा गणपा, वायदंड्याचा लक्ष्या अशी घरं करत तो विश्वास अप्पांच्या घरासमोर येऊन थांबला. दुकानात अप्पांचा चिरंजीव होता. नेहमीप्रमाणे 'अप्पा...' असा बाहेरूनच आवाज देत त्याने दूध घेण्यासाठी बोलवले. अप्पांची पत्नी घरकामात गुंतली असल्याने अप्पाच दुधाचं नेहमीचं जर्मनचं पातेलं घेऊन बाहेर आले. "हिंदबा लेका लय वखत लावलास आज..." म्हणत ख्यालीखुशालीच्या दोन चार गप्पा मारल्यावर त्यांनी पातेलं पुढं केलं. हिंदुरावनं सायकलच्या हँडलला अडकवलेलं दुधाचं माप घेतलं अन उजव्या बाजूच्या किटलीत बुडवलं. गुडगुड करत मापात दूध भरलं तसं जगण्याचा अखेरचा संघर्ष करणारा एक मासाही नेमका दुधासोबत मापात आला. हिंदुरावनं माप बाहेर काढलं अन तसच अप्पांनी पुढं केलेल्या पातेल्यात ओतलं. अप्पांच्या डोळ्यांना तो सळसळणारा अगंतुक अतिथी थेट दुधाच्या पातेल्यात अवतरल्याचे दृष्टीस पडले तशी अप्पांच्या जणू पायाखालची वाळू सरकली. हा सगळा प्रकार क्षणभरात हिंदुरावच्या लक्षात आला तसा तो बावरला. 

चोरी पकडली गेली होतीच वर हा सगळा प्रकार नेमका सोवळं पाळणाऱ्या विश्वास अप्पांच्या सोबत घडला. काहीवेळ दोघांनाही काही सुचेना. अर्धमेला मासा दुधात हलकीशी हालचाल करत होता अन इकडे हिंदुरावच्या ह्रदयात कमालीची ठकठक वाढली होती. "हिंदबा.... गाढवा, दुधात पाणी मिसळ पण निदान पाण्यातलं मासं तरी बाजूला कर. आजपर्यंत कितीदा हे माशावालं दूध आमाला खायाला घातल्यास देव जाणो रं बाबा..." म्हणत अप्पा हिंदुराववर दात ओठ खाऊ लागले. त्यांना खरतंर त्याचा कमालीचा राग आला होता. पण बालपणाचा मैतर असल्यामुळे त्यांनी आपला राग आवरता घेतला. हातातलं पातेलं अप्पांनी बाजूच्या कट्यावर ठेवले अन हिंदुरावच्या नजरेला नजर देत मान मागे टाकून खळखळून फुटलेलं हास्य त्यांनी अगदी मनमुराद अनुभवलं. अप्पांचा हा अवतार पाहून हिंदुरावही त्यांच्या त्या गदगदा हसण्यात सामील झाला. त्याला हसावं का रडावं हेच कळेना पण तरीही तो अप्पांच्या हास्यात हास्य मिळवू लागला. त्यांच्या कलकलीनं आजूबाजूच्या घरातली माणसं बाहेर आली. या दोघांचा इतका कोणता बेत ठरला हे त्यांनाही कळेना. शेवटी अप्पांनीच सगळ्यांना झाला प्रकार सांगितला. सांगताना आणखी तिखट मीठ लावले. ऐकून जमलेली सगळीच पोट धरून लोळपोळ होऊन हसू लागली. पोरंठोरं, बाया बापड्या सगळीच कशी अगदी हास्याच्या महापुरात डुंबून गेली. 

इथून पुढे अप्पांनी हिंदुरावकडून कधीही दूध घेतलं नाही. रतीब लावलेला बंद केला अन शेजारच्या गुरवाच्या भरतकडून रोजचा रतीब चालू केला. या प्रकारातून शिकेल तो हिंदुराव कसला. हिंदूरावचा व्यवसाय चालूच होता. गावात झाडून सगळ्यांना त्याची ही भानगड कळली. करत सगळेच होते फक्त 'सापडला तो चोर' या न्यायाने हिंदुराव बदनाम झाला. त्यानेही यापूढे 'काळजी' घेतली अन दुधात पाणी मिसळताना किटलीच्या तोंडाला कापड लावू लागला. आजही हा प्रकार पंचक्रोशीत चर्चिला जातो. हिंदुराव आता नाही पण, विश्वास अप्पा मात्र अजूनही हे सगळं आठवलं की खदखदून हसतात. त्यांच्यासोबत असलेला प्रत्येक जण हसतो. 'दुधातला मासा' अजरामर झाला अन आप्पांच्या, हिंदुरावच्या नावाभोवती आपलं वलय करून गेला....


संतोष काशीद