बचतीची सवय

Story: छान छान गोष्ट |
10th February, 11:08 pm
बचतीची सवय

गोलू आणि भोलू हे दोघे सख्खे भाऊ होते. दोघे मिळून अभ्यास करायचे, खायचेप्यायचे, मजामस्ती करायचे. गोलू व भोलूच्या आईला आपली ही दोघं गुणी मुलं फार आवडायची. 

गोलू व भोलूचे बाबा, आपल्या दोन्ही मुलांना खाऊसाठी दर आठवड्याला ठराविक पैसे द्यायचे. शाळेच्या परिसरात बरेच फेरीवाले बसायचे. कुल्फीवाला, बर्फाचे रंगीत गोळेवाला असायचा. वडापावची गाडी असायची. एक इसम सँडविच बनवत उभा असायचा, वडाच्या पाराजवळ मन्नु चाचा हातगाडीवर मक्याची कणसं व कोळश्याची शेगडी घेऊन उभे असायचे. मुलांच्या मागणीनुसार, मन्नु चाचा कणसं निवडून ती कोळश्याच्या शेगडीवर लालबुंद भाजून त्यांना तिखटमीठ, लिंबू चोळून द्यायचे. याउपर तिखटमीठ लावलेले पेरू, ओल्या बडीशेपींचे हिरवेगार झुबके, आंबटचिंबट चिंचा, लहानमोठी बोरं, आवळे यांची टोपीवाल्या आजोबांच्या फाटीत जंत्री असायची. मधल्या सुट्टीत मुलं या फेरीवाल्यांजवळ घोळक्याने जमा व्हायची नि खिश्यातली चिल्लर काढून आपल्या मनाजोगता खाऊ घ्यायची. गोलू नि भोलूही मधल्या सुट्टीत शाळेबाहेर येऊन खाऊ विकत घ्यायचे.

एकदा गोलू व भोलूचे बाबा त्यांना म्हणाले, "मुलांनो, मी तुम्हाला दर सोमवारी जे पैसे खाऊसाठी देतो, ते सगळेच खर्च करत जाऊ नका,  थोडे पैसे तुमचे असे, वेळेला जपून ठेवत चला." 

गोलू म्हणाला, "पण बाबा, तुम्ही तर खाऊलाच देता नं पैसे,  मग वापरले सगळे तर पुढच्या आठवड्यात अजून पैसे द्यालच ना!" गोलूच्या या बोलण्याचं त्याच्या बाबांना हसू आलं. त्यांनी दोघांना जवळ घेतलं व कठड्यावर चालणारी मुंग्यांची रांग दाखवली.

"बऱ्या नाहीत या. लालेलाल मुंग्या... चावल्या की कसलं झोंबतं. शिवाय अस्से वडे उठतात जिथे चावा घेतात त्याठिकाणी" भोलू तिथून बाजूला सरकत म्हणाला. भोलूच्या या बोलण्यावर बाबा हसले व म्हणाले, "बाळांनो, या मुंग्यांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे बरं का! या मुंग्या न कंटाळता आपल्याला लागणाऱ्या अन्नाची बेगमी म्हणजे साठा करतात. जेव्हा त्यांना वारूळाबाहेर जाता येत नाही तेव्हा त्या त्यांनी बेगमी केलेल्या धान्यावर उदरनिर्वाह करतात. मुंग्यांचा देह तो केवढुसा? पण बचतीची, कष्टाची सवय वाखाणण्याजोगी."

वडिलांनी सांगितलेली गोष्ट भोलूने लक्षात ठेवली. गोलू मात्र विसरून गेला. दर आठवड्याला खाऊला दिलेले पैसे तो फस्त करत होता. भोलू मात्र अर्धे पैसे बचत करून ठेवू लागला. 

चार महिन्यांनी गोलू व भोलूच्या आईचा वाढदिवस आला. नेमके त्याचवेळी गोलू व भोलूचे बाबा कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी गेले होते. भोलूने, त्याने साठवलेल्या काही पैशातनं आईसाठी मऊशा सपाता घेतल्या व एक रंगीत मण्यांचं पाकीट घेतलं. गोलू व भोलू दोघांनी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भोलूने आईच्या पायात नवीन  सपाता चढविल्या व आईला रंगीत मण्यांचं आकर्षक पाकीट दिलं. गोलू, भोलूचे बाबा आपल्या वाढदिवसादिवशी घरी नाहीत म्हणून नाराज असलेल्या आईची नाराजी कुठल्या कुठे पळाली. 

"भोलू, तू एवढे पैसे कुठून आणलेस रे?" गोलूने विचारलं.

"अरे नै का बाबांनी सांगितलेलं बचत करा. वेळप्रसंगी कामास येते. मी तेच केलं. दिलेल्या पैशांतले थोडे खाऊसाठी वापरले, हळूहळू खाऊसाठी खर्चही कमी करू लागलो नि पैसे साठू लागले. पहिली बचत आईच्या वाढदिवसासाठी वापरायला मिळाली." आईने भोलूला जवळ घेतलं व म्हणाली,"कित्ती समजदार आहे माझं लेकरू!"

गोलूला मात्र कसंसच झालं. आईला भेट म्हणून देण्यासाठी त्याच्याकडे काहीच नव्हतं, तरी आईने त्यालाही कुशीत घेतलं. 

दुसऱ्या दिवशी गोलूने खाऊसाठी पैसे बाहेर काढले खरे; पण बचतीचा मंत्र त्याला आठवला नि त्याने नेहमीपेक्षा निम्माच खाऊ घेतला व उरलेले पैसे त्याच्या खिशात खुळखुळत बचतीचे गाणे गाऊ लागले.


गीता गरुड