चौदावा पोप ग्रेगरिने सन १२३१ मध्येच 'इन्क्विझिशन'ची स्थापना केली होती. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तत्कालीन ख्रिस्ती धर्मपीठानुसार ख्रितेतर सर्व प्रथा, परंपरा आणि धर्मसंकल्पना म्हणजे पाखंड असून अशा पाखंडी वर्तनाला शासन करण्यासाठी निर्माण झालेली संस्था म्हणजे 'इन्क्विझिशन'.
पोर्तुगीज राजसत्तेने गोव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सर्वप्रथम या भूमीवर ख्रिस्ती धर्मसत्ता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले. युरोपहून विविध ख्रिस्ती पंथांना इथल्या लोकांचे धर्मांतर करण्याच्या हेतूने गोव्यात पाठवण्यात आले. अनेक मार्गांनी इथल्या लोकांना बाटवण्याचे कार्य सुरू झाले. धर्मप्रसार करणाऱ्या धर्मांध धर्मप्रसारकांनी आमिष, सक्ती, प्रलोभन, अत्याचार, फसवणूक अशा विविध मार्गांनी लोकांचे धर्मांतर करायला सुरुवात केली. त्याच बरोबर ख्रिस्तेतर धर्मीयांना दुय्यम वागणूक, हिंदू मंदिरांचा विध्वंस, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांवर बंदी इ. गोष्टी पोर्तुगीज राज्यात जुलूम जबरदस्तीने सुरूच होत्या.
चौदावा पोप ग्रेगरिने सन १२३१ मध्येच 'इन्क्विझिशन'ची स्थापना केली होती. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तत्कालीन ख्रिस्ती धर्मपीठानुसार ख्रितेतर सर्व प्रथा, परंपरा आणि धर्मसंकल्पना म्हणजे पाखंड असून अशा पाखंडी वर्तनाला शासन करण्यासाठी निर्माण झालेली संस्था म्हणजे 'इन्क्विझिशन'. युरोपात यांची सुरुवात झाली. अमानुष छळामुळे धर्मांतरित झालेले ज्यू डुकराचे मांस न खाणे आदी परंपरा गुप्तपणे चालू ठेवीत. त्यांना इन्क्विझिशनच्या माध्यमातून शासन करण्यात येई. सन १५६० मध्ये गोव्यात इन्क्विझिशनची सुरुवात झाली. गोव्यात नवख्रितींवर पोर्तुगीजांनी अनेक जाचक बंधने घातली. विवाहप्रसंगी हिंदू पद्धतीची वाद्ये वाजवू नये, पुरुषांनी धोतर नेसू नये, महिलांनी चोळी घालू नये, अंगणात तुळस लावू नये अशा प्रकारचे नियम घालण्यात आले. या भल्या मोठ्या यादीतील अन्न विषयक नियम असे आहेत.
विवाह प्रित्यर्थ तांदूळ कांडू नये, दळण दळू नये. मेजवानीचे पदार्थ वाढताना अनवाणी पायांनी वाढू नये. दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी किंवा स्मृतिप्रीत्यर्थ कुणालाही जेवण देऊ नये. स्त्रियांनी स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करू नये, स्वयंपाक करण्यासाठी ओले वस्त्र नेसू नये आणि भातात मीठ घातल्याशिवाय वाढू नये. हिंदू लोक ज्या दिवशी उपवास ठेवतात त्या दिवशी उपवास ठेवू नये. ग्रहणाच्या दिवशी उपवास करू नये. अशा जाचक नियमांना जो मोडेल त्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा दिली जात असे. सांधे निखळवणे, स्क्रूने अंगठे पिरगळणे, पायावर उकळते तेल किंवा गंधक टाकणे, काखेजवळ जळती मेणबत्ती धरणे अशा क्रूर शिक्षा दिल्या जायच्या. संस्कृती रक्षणासाठी गोव्यातील सामान्य लोकांनी दिलेल्या बलिदानांच्या स्मृती काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत पण इन्क्विझिशनचा अन्नसंस्कृतीवर पडलेला प्रभाव आजही दिसून येतो.
अमेय अभय किंजवडेकर