भावबंध नात्यांचा

माणूस जन्मापासून अगदी बालपणापासून ते शेवटपर्यंत भावबंधांनी जोडला गेलेला असतो. त्याची अनुभूती घेत घेतच तो मोठा होत असतो.

Story: मनातलं |
09th February 2024, 11:55 pm
भावबंध नात्यांचा

नाते जन्माला येते ते नाळेचा आधार घेऊनच. आपले आईशी, वडिलांशी, भावंडांशी, गुरूजनांशी, मित्रांशी, पतिपत्नीचे, बंधु भगिनीशी जे नात्यांचे जाळे विणले गेलेले असते ते प्रेम धागे वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतात. अंतरीचे भावबंध जुळायला प्रेमाचा ओलावा त्यात असणं गरजेचं असतं. प्रेम ही भाववृत्ती कमी अधिक प्रमाणात सर्वांमध्ये असते ती नैसर्गिक आहे. हे प्रेमाचे भावबंध कौटुंबिक नात्यात फार महत्त्वाची भूमिका वढवतात. ते आनंदी असतील तर कुटुंबात सौख्य नांदते. एकमेकांच्या सहवासात राहणाऱ्या  व्यक्तींचे भावबंध आपसुखच जुळले जातात. अशा संबंधात मात्र कसलीही अपेक्षा ठेवली गेली तर त्यातून निराशा पदरी येऊ शकते. प्रेम ही मनाची मनाला आलेली अनुभूती असली पाहिजे. ते व्यक्त करायची गरज पडत नाही ती व्यक्त होत जाते. जी  अंतरातून आलेली असते तिचे मोजमाप होत नाही. मायलेकातले भावबंध हे निखळ, शुद्ध, भाबडे असतात. तिथे कसलीच अपेक्षा नसते. पण  कधी कधी परिस्थिति तीच रहात नाही मनात विकल्प निर्माण होताना दिसतात. त्यामुळे हल्ली आईवडील आणि मुले यांच्यात जनरेशन गॅप निर्माण होऊ लागला आहे. संबंध दुरावत चाललेले दिसतात. एकत्र कुटुंबपद्धती कधीच लोप पावली पण आता कुटुंबाची चौकट ही लहान होत चालली आहे. 

प्रत्यक्ष आयुष्यात नात्यांची वीण विणत विणतच आपल्या आयुष्याचा पट विणला जात असतो. जशी असंख्य तुकडे जोडून बनवलेली गोधडी असते. त्यातला प्रत्येक तुकडा वेगळा असतो. एखादा मृदु मुलायम सिल्क टच असलेला असतो एखादा खादीचा खरखरीत जाडा भरडा असतो, एखादा पातळ तलम असतो, एखादा दाटसर, एखादा गडद रंगाचा, एखादा अगदी फिक्क्या रंगाचा, एखादा रंगीबेरंगी, एखादा विटलेला, एखादा फाटलेला, एखादा कलाकुसर केलेला, एखादा सरळसोट भौमितिक डिझाईन्स असलेला, एखादा गोलगोल चक्रव्यूह असलेला, एखादा बघता क्षणी मनात भरणारा, एखादा पाहता क्षणी नकोसा वाटणारा. कापडाचा पोत, वीण, क्वालिटी, रंग टिकाऊपणा, कोमलपणा, तकलादुपणा याप्रमाणेच त्या गोधडीची रचना पहायला मिळते. इथे जसे कापडाच्या तुकड्यांचे तसेच माणसांचे अनेक नमुने आपल्या आयुष्याच्या पटाशी जोडले गेलेले असतात. तुमची इच्छा असो की नसो ते तुमच्या बरोबर असतातच. त्यांच्या असण्यामुळे तुमचे अस्तित्व निर्माण झालेले असते. जी नातीगोती जोडली जातात त्यांचे पोतही कपड्यांच्या तुकड्याप्रमाणे कधी तरल, कधी मृदु मुलायम, कधी कडक, कधी हळवे, कधी कठोर असे असतात. कुणाचा रखरखीत कोरडा स्वभाव तर कुणाचा भडक तापट, कुणाचा मायाळू, कुणाचा दयाळू. टाक्या-टाक्यांनी शिवून बनवलेली गोधडी जरी कापडाचे तुकडे एकमेकांशी जोडून तयार झालेली असली तरी त्यातून एक उबदार आकर्षक दुलई निर्माण झालेली असते.

तशीच नातीही जीवनात रंग भरायचे काम करतात. जीवनाला अर्थ मिळवून देतात. शेवटी नातेसंबंध म्हणजे तरी काय? तर जे जुळतं ते नातं किंवा जे तुटत नाही ते नातं. याचं सुंदर उदाहरण बहिणाबाईंनी दिलं आहे. 

 ज्याच्यातून गळे पिठी त्याले जाते म्हणून नये |

 जे तुटता तुटलं त्याले नातं म्हणू नये ||

जिथे भावना जुळतात तिथे नातं जुळतं. पण नात्याला घराचं वलय असलं तर ते जास्त विश्वासू बनतं. कधीकधी नात्यात गुंतागुंत निर्माण होते ती अलगद सोडवता आली पाहिजे. प्रेमानं ओथंबलेली नाती सगळीचकडे दिसून येत नाहीत. त्यात कधीकधी वैरभाव, दुरावा, कपटिपणा, असूया, हव्यास ह्या भावनासुद्धा प्रवेश करतात. तर कधी  प्रेमभावनेचे अनेक पैलू त्यामध्ये असतात. भावबंधांमध्ये जो भाव शब्द आहे त्याचा अर्थ अंतरीचे विचार, मनाची मनोवस्था, मनातली चलबिचल व्यक्त करण्याची स्थिति. अगदी बरोबर  नेमके भाव घेऊन अवतरलेली कुठलीही कृती असो, की कलाकृति असो; ती दुसऱ्याच्या मनाला भावते. अशी एखादी कलाकृती मनात ठसते, मनात रुजते कारण त्याच्याशी आपल्या मनाचे भावबंध जुळलेले असतात. आपण ‘भाव तोची देव’ किंवा ‘देव भावाचा भुकेला’ म्हणतो. जिथे मनात भक्तीभाव असेल तिथे साक्षात परमेश्वरही आपल्याशी जोडला जातो.

आपण आपल्या मनाशी फक्त माणसांशीच नाते जोडतो असे नाही तर आपले निसर्गाशी नाते असते, प्राण्यांशी नाते जुळलेले असते, एखाद्या पुस्तकाशी, घराशी, देशाशी, मातीशी, झाडाशी, विचारांशी, भावनांशी, ज्या ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनात असे  प्रेम भाव तरंग उठतात त्या त्या गोष्टींशी आपले नाते जुळलेले असते. ती सजीव असो की निर्जीव,  आपल्या जीवनाचा भाग बनलेली असते. रक्ताने जुळलेली नाती ही जन्मजात असतात पण अशी इतर नातीही आपल्याशी जोडली गेलेली असतात. नकळत निर्माण होतात. कुटुंबातली विविध नात्यांची गुंफण ही कायम ठेवताच बाकीच्या नात्यांचाही विचार केला पाहिजे. सामाजिक धार्मिक पातळीवर हे नाते संबंध जुळून येतात नात्यांचे भावबंध जपणं ही गरज आहे. आजकालच्या ‘मी आणि माझे कुटुंब’ इतकेच मर्यादित न ठेवता त्या पलीकडे पाहायची दृष्टी ठेवली पाहिजे. नाती जपताना त्यातले ताणतणावही समजून घेतले पाहिजे तर ती नाती टिकतात. माणसाचे निसर्ग, परिसर, घर, गाव, समाज, माणसे, भाषा, जात, धर्म या सर्वांशी भावनिक नाते जोडलेले असते.  जे  स्नेहबंध जुळले जातात, ते त्यांचे मनातले भावबंध असतात.

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या रोजच्या सिरियल्समधून अशा अनेक नातेसंबंधाच्या नात्यातली गुंतागुंत, तेढ, अनैतिकता, बदला, सूड, दुष्टता, कपट कारस्थान, अत्याचार, आकर्षण, प्रेम भावना अशा अनेक पैलूंचे दर्शन घडत असल्यानेच जनमानसावर त्याचा पगडा अधिक दिसून येतो. नात्यांमधला कोंडमारा, विचारांची घुसमट, भावनांची गळचेपी, मनामनातली अबोल, अबोध नाती, परिस्थितीचा नात्यांवर होणारा परिणाम, गुंतागुंत, भावुकता सारे या कथानकातून हळूहळू उलगडले जात असते, त्यातून उत्कंठा वाढत जाते. पुढचा भाग पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. अशी मनाला सवय लागते, चटक लागते कारण आपण त्यातल्या कथेच्या नायक-नायिकेच्या भावभावनांशी एकरूप झालेले असतो. त्यांच्याशी आपले नकळत भावबंध जुळलेले असतात. कधी कधी हे सगळे खोटे आहे हे कळत असूनही मनाला स्वस्थता मिळत नाही. हेही लक्षण आपले भावबंधांचे नाते त्यांच्याशी जुळल्याचे दर्शवते.     


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.