वेगवेगळ्या पाहण्यांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र काही बाबतीत समानता दिसते किंवा एकापेक्षा अधिक एक्झिट पोलचे निकाल समान दिसतात. मतदानानंतर झालेल्या या पाहणींना त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अंदाज खरे ठरतील, असे वाटण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
पाच राज्यांपैकी अखेरचे मतदान गुरुवारी पार पडले आणि एक्झिट पोलचे पेव फुटले. अलीकडे एक्झिट पोल अथवा अंदाज हे काही ठराविक पद्धतीने केले जात असल्याने ते एक शास्त्र बनले आहे. बहुतेक एक्झिट पोल खरे ठरतात, असेही मागे दिसून आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाबाबतचा बहुतेक अंदाज खरा ठरला होता, यावेळीही तसे घडेल असे मानले जाते. लाखो मतदारांपैकी काही निवडक मतदारांना त्यांनी मतदान केल्यावर त्यांच्याशी बोलून अंदाज बांधला जातो. अर्थात ही संख्या हजारो असली तरी मतदार मात्र लाखोंनी असतात. मोठ्या राज्यात तर मतदारांची संख्याही मोठीच असते. त्यामुळे एक्झिट पोल हे अखेर अंदाज असतात, हे लक्षात घ्यावे लागेल. पाच राज्यांपैकी मिझोराममध्ये स्थानिक पक्षांचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवते आहे, त्यातही भाजप आणि काँग्रेस पक्ष एखाद्या पक्षाची बाजू घेऊन रिंगणात उतरले होते, पण तेही नावापुरते. त्यामुळे एका स्थानिक पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येतो की, तेथे कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने अस्थिर वातावरण निर्माण होते, हे उद्या (रविवारी) स्पष्ट होईल. तसे पाहता, एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो, जो सहसा लक्षात घेतला जात नाही. अमुक टक्के मतदारांनी विशिष्ट पक्षाला मते दिली आणि ती टक्केवारी ५० च्या पुढे गेली, तरी याचा अर्थ असा नव्हे की, पन्नास टक्के आमदार निवडून येतील. राजकीय पक्षांना मिळालेली मते आणि निवडून येणारे उमेदवार यांची संख्या यात फरक असतो. याच कारणामुळे पाचही राज्यांत सर्वच राजकीय पक्षांची फसगत होण्याची शक्यता आहे.
निवडणूक निकाल अनपेक्षित लागतील यापासून ते विशिष्ट पक्षाला अनुकूल असतील, असे एक्झिट पोल सांगतात. वेगवेगळ्या पाहण्याचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र काही बाबतीत समानता दिसते किंवा एकापेक्षा अधिक पोलचे निकाल समान दिसतात. मतदानानंतर झालेल्या या पाहणींना त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अंदाज खरे ठरतील असे वाटण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. हे अंदाज आता काय सांगतात तेही राजकीय पक्षांना धक्का देणारे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन प्रमुख राज्यांमधील स्थिती दोलायमान वाटत असली तरी भाजप या राज्यांत बाजी मारेल असे एक्झिट पोल सांगतात. हा अंदाज खरा ठरून या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली तर ती भाजपसाठी मोठी उपलब्धी मानली जाईल. याचा परिणाम थेट लोकसभा निवडणुकीवर जाणवेल. फार थोड्या फरकाने मध्य प्रदेश भाजप काबीज करील तर राजस्थानमध्ये मोठ्या फरकाने भाजप सत्ता मिळवेल, असा सर्वसाधारण कल या अंदाजात व्यक्त झाला आहे. अशा प्रकारे दोन महत्त्वाची राज्ये भाजपला मिळाली तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. या दोन राज्यांतील निकाल याच कारणामुळे लक्षवेधी ठरले आहेत. विद्यमान सरकारविरोधात असलेल्या नाराजीचा परिणाम होतो की जनता सरकारच्याच बाजून उभी ठाकते, हे निकालात स्पष्ट होऊ शकेल. याचाच अर्थ परिवर्तन की जैसे थे स्थिती याचा फैसला रविवारी होईल. त्यावेळी मतदारांच्या मनात काय असेल याचे चित्र वेगळे नसेल असे म्हणता येणार नाही, कारण हे केवळ अंदाज आहेत.
अशा प्रकारे तीन राज्यांतील निकाल काय असतील, याचे अंदाज स्पष्ट झाल्यावर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांवर नजर टाकली आणि एक्झिट पोलचा संदर्भ घेतला तर काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलंगणसारख्या राज्यात दशकानंतर काँग्रेस परतली तर ती महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे. बीआरएसचा पराभव करून काँग्रेसने बाजी मारली तर तो पक्ष देशात सावरू शकेल. भाजपला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे, असे दिसते. प्रादेशिक पक्षाला आवरणे काँग्रेसला जमले तर त्या पक्षाचे विरोधकांच्या इंडिया आघाडीतील वजन वाढणार आहे. छत्तीसगडमधील विजयाचे वेध काँग्रेसला लागले आहेत, जे प्रत्यक्षात यश प्राप्त करून देतील, असे एक्झिट पोल दर्शवितात. याचाच अर्थ दोन राष्ट्रीय पक्षांना पाचपैकी चार राज्यांत यश लाभेल असे अंदाज सांगत आहेत. प्रत्येकी दोन राज्ये मिळाली तरी ती दोन्ही पक्षांना नवे बळ देणारी ठरतील यात शंका नाही. एक मात्र खरे की, अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यातील फरक रविवारी संध्याकाळपर्यंत कळेल, तोपर्यंत प्रतीक्षा करायची.