तेल कपात झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट

Story: विश्वरंग | |
01st December 2023, 11:34 pm

अमेरिकेचा बदला घेण्यासाठी अरब देशांनी पाश्चिमात्य देशांना होणारा खनिज तेल पुरवठा बंद केला होता. या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा धोरण आणि पश्चिम आशियातील शक्ती संतुलनावर मोठा परिणाम झाला होता. या घटनेला बरोबर ५० वर्षे झाल्यानंतर आता पुन्हा इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे.

इस्रायलने गाझावर हल्ले सुरूच ठेवले असताना अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. इस्रायलच्या कृतीमुळे अरब देश संतापले आहेत. अशा परिस्थितीत अरब देश युद्ध संपवण्यासाठी तेल पुरवठ्यावर बंदी घालून पाश्चिमात्य देशांवर दबाव आणणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट, पाश्चिमात्य देशांचे चीनसोबतचे व्यापार युद्ध, रशियाचा युक्रेनवरचा हल्ला आणि युरोपाविरुद्धचे गॅस धोरण याच्या परिणामांशी जागतिक अर्थव्यवस्था अजूनही झगडत आहे. जर पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील खनिज तेल आणि वायूने समृद्ध असलेल्या देशांनी तेल उत्पादनात कपात करण्यास सहमती दर्शविली आणि मित्र नसलेल्या देशांना पुरवठा बंद केला तर त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे संकट येऊ शकते.

इस्रायल-हमास युद्धाच्या तीव्रतेच्या संदर्भात नुकतीच सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे अरब आणि इस्लामिक देशांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तेल पुरवठा बंद करण्याबाबत फारशी चर्चा झाली नाही. अमेरिका आणि इस्रायलवर दबाव वाढवण्यासाठी काही देशांनी अनेक कल्पना मांडल्या. परंतु, तेल निर्यात बंदीविषयी एक शब्दही नाही. परंतु, इराणचे सर्वोच्च नेते, अमेरिका आणि इस्रायलचे शत्रू अयातुल्ला अली खामेने यांनी इस्रायलला तेलाचा पुरवठा कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, त्याला इतर देशांचा पाठिंबा मिळाला नाही. इस्रायल दररोज ३,००,००० बॅरल तेल खरेदी करतो. इस्रायलला इतर तेल पुरवठा करणाऱ्यांमध्ये कझाकिस्तान आणि अझरबैजान यांचा समावेश होतो. इराणच्या आवाहनानंतर अरब आणि इस्लामिक देशांनी विधाने करून स्पष्ट केले की, त्यांना तेल पुरवठा प्रकरणाचे राजकारण करायचे नाही.

अरब देशांनी दोनदा पाश्चिमात्य देशांना होणारा खनिज तेल पुरवठा बंद केला आहे. सहा दिवसांच्या युद्धादरम्यान १९६७ मध्ये पहिल्यांदा पुरवठा थांबवण्यात आला होता. नंतर १९७३ मध्ये योम किप्पूर युद्धादरम्यान तेलपुरवठ्यावर बंदी आणली. पहिली बंदी कुचकामी ठरली, पण दुसऱ्या बंदीचे गंभीर परिणाम झाले. या घटनांमधून पाश्चात्य आणि अरब देशांनी धडा घेतला. त्यामुळे आता तेलाचा पुरवठा बंद करण्याबाबत कोणी बोलत नाही. आता कोणीही ते करू इच्छित नाही. पन्नास वर्षांपूर्वी इस्रायलला वाटत होते की, कोणीही त्यांच्यावर हल्ला करणार नाही. त्याचप्रमाणे अरब देश खनिज तेलाचा पुरवठा बंद करणार नाहीत, असे अमेरिकेने गृहीत धरले. पण, या दोन्ही विश्वासांना मात्र तडा गेला आहे.

यौम किप्पूर युद्धात इस्रायलवर हल्ला झाल्यानंतर दहा दिवसांनी अरब देशांनी अमेरिका, नेदरलँड आणि अनेक पाश्चात्य देशांना होणारा खनिज तेल पुरवठा बंद केला. त्यामुळे तेलाच्या किमती पाचपटीने वाढल्या. त्यावेळी खनिज तेल हे जगातील मुख्य ऊर्जा स्रोत होते. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली.

- सुदेश दळवी, गाेवन वार्ताचे उपसंपादक आहेत