फोबिया- मुलांच्या प्रगतीमधील समस्या (भाग १)

वर्तमानकाळात आपल्या जीवनात उत्पन्न झालेले दैनंदिन तणाव आपल्या मनातील भीतीमुळेच आहेत. त्यामुळे पालक या नात्याने आपल्या मुलांच्या मनात असलेली भीती जर आपण घालवली तर विचार करा की आपल्या मुलांचे बालपण किती सुंदर बनेल.

Story: पालकत्व |
01st December 2023, 10:36 pm
फोबिया- मुलांच्या प्रगतीमधील समस्या  (भाग १)

मुले आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीस तोंड देतात. भीती ही एक अशी भयावह भावना जी आपला आत्मविश्वास तर कमी करतेच व आपल्या जीवनात अपयशालासुध्दा कारणीभूत असते. मनातील भीतीचे वेगवेगळे स्वरुप असते, उदा. काळोखाची भीती, उंचीची भीती, आगीची भीती, मुख्य म्हणजे परीक्षेची भीती, वा कुठलीही जागा, एखादा प्रसंग, एखादी वस्तू, एखाद्या कडक वृत्तीच्या व्यक्तीची भीती इ. मग त्या भीतीला आपल्या मुलांच्या मनातून लवकरात लवकर घालवून द्यावे असे प्रत्येक पालकाला वाटते. कारण भीती कशाचीही असो पण त्या भावनेत संपूर्ण मनाला नियंत्रित करुन व्यक्तीचे वर्तमान व भविष्याचे चित्र बिघडवून टाकण्याची ताकद असते. याचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण, जी बहुतेक विद्यार्थ्यांची समस्या असते ती म्हणजे व्यासपीठाची भीती होय. अनेक पालकांना ही समस्या असते की, आपले मूल शाळेत कुठल्याही कार्यक्रमात इतर मुलांसोबत सहभागी होत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे व्यासपीठाची भीती, या भीतीचे मुलांच्या मनात इतके वर्चस्व असते की, ती व्यासपीठावर पाऊलसुध्दा ठेवण्यास असमर्थ असतात.

अशा पध्दतीच्या विशिष्ट प्रकारच्या भीतीला आपल्या विज्ञानाने फोबिया हे नाव दिलेले आहे आणि जोपर्यंत मुलांच्या मनातील या भीतीचे किरकोळ सामान्य स्वरुप असते, तोपर्यंत पालक सहजरीत्या आपल्या मुलांना भीतीमुक्त करु शकतात. 

मुलांच्या मनात भीती आहे हे कसे ओळखावे?

पालकांनी मुलांशी मुक्तपणे संवाद साधावा. जर मुले पालकांसमोर पूर्णपणे आपल्या मनाचा गाभारा उघडतात, तर त्यांच्या मनात कुठलीही भीती नाही हे सहजरीत्या समजते. 

पालकांनी मुलांना पटवून द्यावे की, त्यांच्या मनातील प्रत्येक भावना पालकांसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जितक्या त्यांच्या स्वत:च्या भावना होय. पालकांनी शक्य तितक्या लवकर मुलांची भीती घालवायचा प्रयत्न करावा.

आपण पालकांच्या सानिध्याखाली तसेच शाळेत सतत सुरक्षित आहोत, याची खात्री मुलांना पालकांनी करुन द्यावी. जर सदोदित फुलपाखरांसारखे बागडणारे मूल अचानक काही दिवसांपासून तणावग्रस्त दिसत असेल तर पालकांनी त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष द्यावे.

ज्या गोष्टीची भीती मुलांच्या मनात बसली असेल, त्या गोष्टीबाबत मुलांची प्रतिक्रियासुध्दा भिन्न असेल, जेणेकरुन वागण्याच्या त्यांच्या पध्दतीत झालेला हलकासा बदल सुद्धा आपल्याला त्यांच्या भीतीची कल्पना देऊ शकतो.

मुलांची घरातील वागण्याची पध्दत जर बदलली असेल, तर या बाबतीत, ते मूल शालेय वातावरणात स्वत:ला कसे सामावून घेत आहे याबद्दल मुलांच्या शिक्षिका तसेच, त्यांच्या मित्रमंडळींशी संवाद साधावा व दोन्हीमध्ये काय साम्य व वेगळेपणा आहे हे जाणून घ्यावे.

मनात भीती असेल तर मूल नक्कीच तणावाखाली येते. त्यामुळे रात्री जर मुले शांत झोपत नसतील तर त्यांच्या मनातील विचारांचा कानोसा घ्यावा.

आजकाल अशा तणावांमुळे मुले अगदी बालवयात रक्तदाब, मधुमेह सारख्या आजारांना बळी पडतात. त्यामुळे जर मुलांना अशी कुठलीही समस्या आढळली असेल तर या विषयाचे गांभीर्य पालकांनी समजावे.

काही मुले आपल्या मनातील भीती वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त करतात, उदा. त्या गोष्टीच्या संपर्कात आल्यावर अस्वस्थ होणे, हात पाय गार होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रडायला लागणे, हाताची बोटे मोडणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, बोलताना अडथळे येणे, रडायला लागणे अशा पध्दतीने जर मुले वागत असतील तर नक्कीच त्यांच्या मनात कुठली तरी भीती दडून बसलेली आहे हे समजावे.

जर एखादे मूल, काहीही केल्यास आपल्या मनातील भीतीविषयी पालकांना सांगत नसेल, तर पालकांनी एका उत्कृष्ट सल्लागाराची मदत घ्यावी.

पूजा शुभम कामत सातोस्कर