साहित्यिक डॉक्टर आरती दिनकर

डॉक्टर म्हटलं की, डोळ्यासमोर येतात औषधाच्या गोळ्या, औषधे आणि त्यांचा औषधी वास... रुग्णांच्या जीवनातील रोग नाहीसे करण्यासाठी औषधे, गोळ्या यांच्या सदैव संपर्कात असलेल्या डॉक्टरांचे जीवन हे रुक्ष असते अशी आपली बहुतेक सर्वांचीच धारणा असते. पण जेव्हा डॉक्टर साहित्याची कास धरतो, तेव्हा त्याच्या जीवनात ही साहित्यगंध पसरतो. कवितेचा सुवास दरवळतो...

Story: तु चाल पुढं |
01st December 2023, 10:25 pm
साहित्यिक डॉक्टर आरती दिनकर

डॉ. आरती दिनकर या पेशाने  होमिओपथिक डॉक्टर. गेली ३६ वर्षे त्या या पेशात असून समुपदेशक व साहित्यिक म्हणूनही त्यांची आज ओळख आहे. गोव्यातील प्रमुख मराठी दैनिकात त्यांचे अनेक लेख, ललित कथा, कविता प्रकाशित झाल्या आहेत. आजपर्यंत त्यांची १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या आरोग्य कथा या वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. जनजागृती करणार्‍या या आरोग्य कथा वाचताना वाचकांना प्रत्येक कथेमधून नवीन माहिती मिळते. आरोग्य कथा लिहिताना त्यांनी प्रत्येक कथेमध्ये एका रुग्णाचा आजार, त्याची लक्षणे, हा आजार का व कसा होतो, त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, घरातील सदस्यांनी त्या रूग्णाला कसे समजून घ्यावे व त्याची काळजी कशी घ्यावी, त्या रोगावर कोणती होमिओपॅथी औषधे आहेत आणि ही औषधे कशी व केव्हा घ्यावीत याबाबतचे सर्व मार्गदर्शन आहे. त्यामुळे त्यांच्या कथा वाचताना तशी लक्षणे असलेला आपला परिचित कोणी असेल, तर त्याबाबत आपण कोणती काळजी घ्यावी, अथवा त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या घरच्या सदस्यांना आपण कसे मार्गदर्शन करावे, याचा अंदाज ही आपल्याला थोडाबहुत येतो. तसेच एखादा रोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि समजा, एखादा कोणताही  रोग झालाच, तर त्यावर कोणती औषधे उपयुक्त आहेत, याची ही सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या कथांमधून मिळते. त्यामुळे त्यांच्या या कथा रोचक बनत चालल्या आहेत. आणि वाचकांमध्ये ही त्या लोकप्रिय होत आहेत.

होमिओपॅथी आणि मानसिक रोग लक्षणांवर समुपदेशन, लहान मुलांचे रोग, स्त्रियांचे रोग, वयानुसार होणारे बदल, वार्धक्यातील आजारपण या व अशा अनेक रोगांवर डॉ. आरती दिनकर या उपचार करत असून याचबरोबर त्यांचे समुपदेशन ही सुरू आहे. गोव्यातील अनेक आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार व समुपदेशन देण्याचे कार्य त्यांचे अविरतपणे चालू आहे. गोव्यातील दुर्गम भागातील खेड्यापाड्यात जाऊन येथील रुग्णांची मोफत तपासणी त्या करतात. हे सर्व करताना त्या रुग्णांना स्वच्छता कशी राखावी, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे ही सर्व समजावून सांगतात.

त्यांच्या या आरोग्य कथा केवळ गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरील अनेक लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच घरोघरी भिंतीवर असणाऱ्या कालनिर्णय दिनदर्शिकेमध्ये ही त्यांचे आरोग्यावरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करताना उद्योगशील तसेच साहित्यिक स्त्रियांच्या मुलाखती ही त्यांनी घेतल्या आहेत. त्यांना २००८ सालचा गोवा राज्य सरकारचा यशोदामिनी पुरस्कार लाभला असून इतर अनेक पुरस्कारांच्या ही त्या मानकरी आहेत. डॉ. आरती दिनकर या जशा लेखिका आहेत, तशाच त्या उत्तम कवयित्री आहेत. अति लघुत्तम कथा म्हणजेच “ अलक “ या कथा प्रकारातील कथांचे लेखन ही त्यांनी केले आहे. अलक या कथा साहित्य प्रकार म्हणजे अगदी थोडक्या वाक्यांत म्हणजे अगदी पाच ते सहा वाक्यांत कथा लिहावी लागते. आणि शेवटी कथेमधला ट्विस्ट असावा लागतो. अलक या प्रकारातील कथा लिहिण्यासाठी लेखकाची कसोटी लागते. कारण अगदी थोडक्या वाक्यांत कथेतील भावार्थ वाचकांसमोर मांडावा लागतो.  आणि हे डॉ. आरती दिनकर अगदी लीलया करतात. गोव्यात अलक हा साहित्यप्रकार तितका रुळला नसला तरी डॉ. आरती या साहित्यप्रकारात कसलेल्या लेखिका आहेत. साहित्यामध्ये अलक साहित्य प्रकारात किंवा कविता, कथांमध्ये नवे प्रयोग, नवा प्रवाह आणण्यासाठी साहित्यिकांना एकत्रित आणून त्यांना व्यासपीठ देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या नेक कार्यासाठी शुभेच्छा.

कविता प्रणीत आमोणकर