डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय ?

Story: आरोग्य |
01st December 2023, 10:22 pm
डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय ?

डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) ही एक अशी स्थिती आहे ज्यात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. ६० वर्षांपुढील कोणालाही ही स्थिती प्रभावित करू शकते. या जास्त करून पायात बनतात व अचानकपणे त्या भागात सूज, लालसरपणा दिसून येते. पण सामान्य लोकांना याबद्दल एवढी माहिती नसल्याने, एक तर याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा चुकीच्या दिशेने तपास चालू होतो. मग डीव्हीटीचा निष्कर्ष लागेपर्यंत कधी कधी उशीर झालेला असतो. अनेक वेळा डीव्हीटीमुळे आलेल्या सुजेवर योग्य प्रकारे उपचार न झाल्याने किंवा मालिश केल्यामुळे जीवही धोक्यात येऊ शकतो. आपल्या देशात डीव्हीटी होण्याचे प्रमाण ८ ते २० टक्के आहे.

आपल्या शरीरातील व्हेन्स या नसा, फुफ्फुस आणि हृदयापर्यंत दूषित रक्त पोहोचवण्याचे काम करतात. यानंतर ते रक्त शुद्ध होऊन पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवले जाते. यातील आतील नसा म्हणजेच डीप व्हेन्स या अन्य नसांच्या तुलनेत त्वचेपासून ब-याच खोल असतात.

यामध्ये काही कारणांमुळे ब्लड क्लॉट/ थ्रोम्बस तयार होतो व रक्ताच्या गाठी जमा होतात. या गाठींमुळे रक्त सुरळीतपणे न वाहता, त्यात अडथळा येतो व दूषित रक्त फुफ्फुस आणि हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. तसेच गाठी अभिसरण प्रणालीतून जाण्याची व शरीराच्या दुस-या एखाद्या भागात अडकून बसण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्या भागात सूज येते आणि वेदना होतात.

डीव्हीटी झालेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी आपल्या जागेवरून सुटून रक्तप्रवाहासोबत फुफ्फुसापर्यतही जाऊन तिथे फसू शकतात. हे श्वसनप्रक्रियेत अडथळादायक ठरू शकते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यांचा जीव जाऊ शकतो. अनेक वेळा डीव्हीटी झाल्यावर त्या भागाची जास्त हालचाल केल्याने, मसाज केल्यानेही हे घडू शकते. ही स्थिती जास्त करून पायातील डीप व्हेन्स मध्ये दिसून येते पण शरीराच्या इतर भागी जसे हात, मेंदू, आतडे, लिव्हर, कीडनी यामध्येही होऊ शकते.

रक्तप्रवाह अडवणार्‍या कोणत्याही गोष्टीमुळे डीव्हीटी होऊ शकतो. रक्तवाहिन्यात दुखापत, शस्त्रक्रिया, हृदयरोग किंवा गंभीर संसर्ग, काही औषधांचे सेवन, दीर्घकाळ निष्क्रियता, अंथरूणाला खिळून असणे, पायात कुठलीच हालचाल नसणे डीव्हीटी होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. तर अनुवांशिकता, गर्भधारणा, गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, लठ्ठपणा, धूम्रपान, हृदय विकार, शरीरातील पाण्याची पातळी कमी असणे, असमतोल आहार, जास्त वेळ बसून प्रवास करणे हे डीव्हीटीचा धोका वाढवणारे घटक ठरू शकतात. पायात सूज येणे, पाय दुखणे, पायात उष्णता/ उबदारपणा जाणवणे ही डीव्हीटीची प्रमुख लक्षणे आहेत. पोटाच्या नसांमध्ये डीव्हीटी असल्यास पोट दुखणे, फुगणे किंवा वारंवार उलट्या होणे हे दिसून येते. कधी कधी कोणतीही शारीरिक लक्षणे न दर्शवताही रुग्णांमध्ये डीव्हीटी उपस्थित राहू शकतो.

 दीर्घकाळ या आजारावर योग्य उपचार न घेतल्यास अन्य रक्तवाहिन्यांमध्येही गाठी होण्यास सुरुवात होते. कालांतराने पायाची त्वचा काळवंडण्यास सुरुवात होते, पायाला न भरणारी जखम होते, रक्तवाहिन्यांमध्ये ताण निर्माण होतो. उभे राहिल्यावर पाय दुखतात, वेदनेमुळे रात्री झोप येत नाही. वेळेत उपचार केले नाहीत, तर जन्मभर त्रास भोगावा लागू शकतो.

 डीव्हीटीचे निदान करण्यासाठी डी डायमर चाचणी, अल्ट्रसाऊंड, व्हेनोग्राफी, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन, पल्मनरी अँजिओग्राफी या सारख्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.

 डीव्हीटी झालेल्या किंवा होण्याची संभावना असलेल्या रूग्णांना रक्त पातळ करण्याची औषधे दिली जातात. उपचारपद्धतीमध्ये थ्राँबोलायसिस ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. फुप्फुसांपर्यंत क्लॉट पोहोचण्याची शक्यता असल्यास आयव्हीसी फिल्टर (विशिष्ट प्रकारची जाळी) मुख्य रक्तवाहिनीमध्ये टाकली जाते. त्यामुळे क्लॉट फुप्फुसांपर्यंत पोहोचत नाही. उपचारांनंतरही डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे व रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या चालू ठेवणे आवश्यक असते.

शरीराची जास्तीत जास्त हालचाल ठेवणे, जास्त वेळेपर्यंत एका जागी न राहणे, भरपूर पाणी पिणे, पायांच्या स्नायूंचा व्यायाम करणे, पोटरीला घट्ट दाबून ठेवतील असे पायमोजे (स्टॉकिंग्स) वापरणे, सक्रीय जीवनशैलीचं पालन करणे या गोष्टींचे अवलंबन केल्याने डीव्हीटीवर प्रतिबंध आणण्यास मदत होऊ शकते.

 रुग्ण एका जागी असल्यास किंवा डीव्हीटीची शक्यता असल्यास मालिश करताना सावधानी बाळगावी. तसेच संभवनीय लक्षणे असल्यास आपण रोगनिदान करण्याऐवजी किंवा पाय चेपणे, चोळणे, गरम पाण्यात ठेवणे हे चुकीचे घरगुती उपचार करण्याऐवजी वैद्यकीय सल्ला तातडीने घ्यावा, जेणेकरून परिणाम टाळले जाऊ शकतात.

डॉ. श्वेता राऊत मुळगावकर