फर्निचर देण्याच्या नावाखाली ९.२८ लाखांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:41 am
फर्निचर देण्याच्या नावाखाली ९.२८ लाखांची फसवणूक

पणजी : फर्निचर आणि इतर वस्तू पुरविण्याच्या नावाखाली पणजीतील अल्काॅन रिअल इस्टेट प्रा. लि. कंपनीला ९.२८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने बाली-इंडोनेशिया येथील पिलार बोली फर्निचर कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अल्काॅन रिअल इस्टेट प्रा. लि. कंपनीचे संचालक विनय अल्बुकर्क यांनी तक्रार दाखल केली आहे. एका व्यक्तीने बाली-इंडोनेशिया येथील पिलार बोली फर्निचर कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून कंपनीच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर संशयिताने फर्निचर, टेराकोटा वस्तू व इतर वस्तू पुरविण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर संशयितांनी तक्रारादाराच्या कर्मचाऱ्यांना सदर कंपनीच्या बँक खात्यात ११ हजार यूएस डॉलर (९.२८ लाख रुपये) जमा करण्यास सांगितले.

पैसे खात्यात जमा केल्यानंतर सदर कंपनीकडून वस्तू पुरवण्यासंदर्भात काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर संदर कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती समोर आली. त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार कंपनीच्या संचालकाने सायबर गुन्हा विभागात तक्रार दाखल केली. सायबर गुन्हा विभागाचे अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दयेकर यांनी वरील कंपनीच्या अज्ञात कर्मचाऱ्याच्या विरोधात भादंसंच्या ४१९, ४२०, आरडब्ल्यू ३४ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


हेही वाचा