पणजी : तमनार वीज निर्मिती प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी राज्य सरकारच्या वन आणि वीज खात्याला पाठपुरवठा करण्याचे निर्देश दिले केंद्र सरकारच्या सचिवांनी दिले आहेत. प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
राज्य सरकारमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली. तमनार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३१ मे २०२५ ही नवी मुदत निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम समाधानकारक पद्धतीने सुरू आहे. गोवा राज्य सरकारच्या वन आणि वीज खात्याने उर्वरित कामे पूर्ण करून काम पुढे नेण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे.
तमनार, रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण तसेच गोव्यात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अधिकारी गटाची दिल्लीत बैठक झाली. गोव्याचे मुख्य सचिव तसेच इतर अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
या प्रकल्पाला गोवा राज्य वन जीव मंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. सांगोड ते कर्नाटक सीमेपर्यंत४०० केव्ही वीज लाईनच्या बांधकामाचा या प्रकल्पात समावेश आहे. विजेची गरज भागवण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे, असे प्रमोद सावंत म्हणाले.
वीजपुरवठा सुधारण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. गोवा चेंबरने गोवा सरकारला पत्र लिहून प्रकल्पासाठी परवानग्या देण्याची आणि अडथळे दूर करण्यास सांगितले आहे. ज्या जागेवर टॉवर उभारला जाईल, त्या जागेवरील झाडे तोडण्यात येणार आहेत. इतर झाडे तोडली जाणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या, गोव्याकडे पश्चिम ग्रीडमधून वीज पुरवठा करणारी फक्त एक ४०० केव्ही लाईन आहे. तमनार प्रकल्प झाल्यास पश्चिम ग्रीडमधील लाईन खराब झाल्या तरी पर्यायी व्यवस्था करणे सोपे होईल.
१४ मार्च २०१८ रोजी कामाचा प्रारंभ
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा प्रकल्प गोवा, कर्नाटक आणि छत्तीसगड राज्यांशी संबंधित आहे. १,५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम १४ मार्च २०१८ रोजी सुरू झाले. ३० नोव्हेंबर २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले. प्रकल्प पूर्ण करण्याची नवीन मुदत ३१ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे.