‘बाकीबाब ते आयज...’ बोरकरांच्या कवितांचा रसिकांनी लुटला आनंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:27 am
‘बाकीबाब ते आयज...’ बोरकरांच्या कवितांचा रसिकांनी लुटला आनंद

काव्यसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंंगी डॉ. राजय पवार, अन्वेषा सिंगबाळ व इतर.

मडगाव : कोकणी भाषा मंडळातर्फे आयोजित बाकीबाब ते आयज या काव्यसंवाद कार्यक्रमात सहभागी कवींनी बा. भ. बोरकर यांच्या विविध कवितांसह स्वयंलिखित कवितांच्या केलेल्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. बोरकर यांच्या कविता या काळातील असून गोव्याची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व गोष्टींचा आढावा घेणारा दस्तावेज आहे, असे मत कार्यक्रमाध्यक्ष राजय पवार यांनी व्यक्त केले.

कोकणी भाषा मंडळातर्फे आयोजित बाकीबाब ते आयज या काव्यसंवादातील काव्यसरींनी उपस्थितांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. हा कार्यक्रम कोकणी भाषा मंडळाच्या सभागृहात गुरुवारी सायंकाळी झाला. काव्यसंवादाचे अध्यक्षपद साहित्यकार तथा कला अकादमी थिएटर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजय पवार यांनी केले. या काव्यसंवाद कार्यक्रमात सारिका नायक, दिगज बेणे, अव्दैत साळगावकर, ममता वेर्लेकर, विश्वप्रताप पवार, रिया बेंगलोरकर, ऐश्वर्या नायर, महादेव गावकर, डॉ. तन्वी कामत बांबोळकर, गौरांग भांडिये, आकाश गावकर, अनीश अग्नी यांनी कविता सादर केल्या.

यावेळी कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ उपस्थित होत्या. यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले की, बाकीबाब यांच्या कविता भावनेने भरलेल्या होत्या. तर ज्यावेळी टीका करण्याची वेळ आली त्यावेळी तीही कवितेतून केलेली दिसते. बाकीबाब यांच्या मराठीतील कवितांचे कौतुक महाराष्ट्रापासून केले जाते, पण त्यांच्या कोकणी कविताही खूप खोलातील विषयांना हात घातलेला दिसतो. त्यांचे लिखाण हे आताच्या पिढीसाठी दस्तावेज आहेत. बाकीबाब यांनी मुक्तीलढ्यातील विविध घटनांचा संदर्भही दिलेला आहे व त्यावेळीचा गोवा साहित्यातून दर्शवलेला आहे. त्यांच्या साहित्याचा राजकीय, सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक दृष्टीकोनातून अभ्यास व्हावा, अशी इच्छाही व्यक्त केली.

यानंतर उपस्थित कवींनी सुरुवातीला बाकीबाब यांची एकेक कविता सादर केली व त्यानंतर आपण लिहिलेली कविता सादर केली. पुरुषोत्तम वेर्लेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.