आमदार लोबो यांची सरकार, मलनिस्सारण महामंडळाकडे मागणी
म्हापसा : कळंगुटमधील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प सुरू होण्याच्या प्रतिक्षेत रहिवासी आहेत. हा प्रकल्पाला अडथळा ठरणारी आणि साळगाव कचरा प्रकल्पाला जोडणाऱ्या रिव्हर्स जलवाहिनीचे काम हाती घेण्याची मागणी आमदार मायकल लोबो यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंबंधी आमदार लोबो यांनी सरकार तसेच मलनिस्सारण महामंडळाला पत्र पाठवले आहे. प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी साळगाव कचरा प्रकल्पामध्ये वापरता येईल व या पाण्याचा सदुपयोग होईल. यासाठी या रिव्हर्स जलवाहिनीचे काम तातडीने हाती घ्यावे आणि मलनिस्सारण प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी लोबो यांनी या पत्राच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे. हल्लीच कळंगुट ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करत चार वर्षांपूर्वी मलनिस्सारण प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प गावासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे.
दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेतले होते. सांडपाणीवाहू वाहिन्या आणि प्रकल्पावर करोडो रूपये खर्च केला आहे. हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही घरे आणि हॉटेलचे सांडपाणी खाडी व नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही रहिवास्यांनी ग्रामसभेत केली होती.
आमदार मायकल लोबो यांनी सांगितले, मलनिस्सारण प्रकल्पात प्रक्रिया केलेला पाणी बागकाम, शेती किंवा औद्योगिक वसाहतीसाठी वापरायला हवे. त्यासाठी या प्रकल्पात प्रक्रियायुक्त पाणी साळगाव कचरा प्रकल्पाकडे पाठवण्याचा प्रस्ताव आहे. कारण या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते.
जेव्हा या एसटीपी प्रकल्पाची चाचणी केली. तेव्हा हे प्रक्रियायुक्त बागा खाडीत पाणी सोडावे लागले. यास मी आणि पंचायतीने आक्षेप घेतला होता. आम्ही हे पाणी नदीत जाऊ देऊ सकत नाही. प्रकल्पाची घरोघरी जोडणी देण्यापूर्वी पाणी कचरा प्रकल्पामध्ये गेले पाहिजे. यासाठी सरकारने ही पाईपलाईन घालावी, असे ते म्हणाले.
टँकरचे फोटो पंचायतीला पाठवा
दरम्यान, कळंगुट पंचायत क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात टँकरमधील सांडपाणी बागा खाडीसह नाल्यांमध्ये सोडत आहेत. अशा तक्रारी पंचायतीकडे आल्या आहेत. त्यामुळे या टँकरवर कारवाई करण्यासाठी लोकांनी त्या टँकरचा फोटो काढून आपल्याकडे किंवा प्रभाग पंच सदस्यांकडे संपर्क साधावा. पंचायतीकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी केले आहे.