पणजी : राज्यात महिला एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात पाच वर्षांत १४ टक्क्यांनी घट झाली आहे. एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
राज्यात २०१८ ते २०२२ या काळात पुरुषांच्या तुलनेत महिलांना एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण सुमारे १४ टक्क्यांनी घटले आहे. २०१८ मध्ये एचआयव्हीच्या एकूण बाधितांपैकी ५७.८ टक्के पुरुष तर ४२.२ टक्के महिला होत्या. २०२२ मध्ये पुरुष बाधित ७२.५ तर महिला बाधित २७.५ टक्के होत्या.
अहवालात १४ वर्षांखालील, १५ ते २४, २५ ते ३४, ३५ ते ४९ आणि ५० वर्षांवरील असे महिला व पुरुष बाधितांचे गट करण्यात आले आहेत. राज्यात १९९२ मध्ये महिला बाधितांची टक्केवारी सर्वाधिक ६३.२ इतकी होती. १९९३ मध्ये हीच टक्केवारी ५६.१ होती. १९९६ मध्ये एकूण एचआयव्ही बाधितांपैकी महिलांची टक्केवारी १०.१ इतकी होती. हे आतापर्यंतचे सर्वात कमी प्रमाण आहे.
वयोमानानुसार पाहिल्यास गेल्या चार वर्षांत ३५ ते ४९ वयोगटातील महिलांना एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. २०२२ मध्ये या वयोगटातील एकूण बाधितांपैकी केवळ २० टक्के महिला होत्या. तर २५ ते ३४ वयोगटातील एकूण महिला आणि पुरुष बाधितांपैकी ९४.७ टक्के पुरुष व ५.३ टक्के महिला होत्या. २०२१ मध्ये याच वयोगट आकडेवारी ७८.३ टक्के पुरुष तर २१.७ टक्के महिला अशी होती.