जाणून घेतल्या फर्नांडिस यांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, इजिदोर फर्नांडिस व इतर कार्यकर्ते. (संजय कोमरपंत)
काणकोण : राजकारणात हरले, सत्ता गेली, तरी राजकारणी म्हणून एखाद्या व्यक्तीची कदर केली जाते, याची प्रचिती बुधवारी आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रमेश तवडकर यांच्याविरुद्ध निवडणुक लढवून ६०१२ मते घेतलेल्या माजी मंत्री तथा माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या लोलये येथील निवासस्थानी बुधवारी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी भेट दिली.
मुळ भाजपच्या मात्र पक्षाने तिकिट नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवार राहिलेल्या इजिदोर फर्नांडिस यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याच्या समस्या मुख्यमंंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, अरुण भट, नंदिप भगत, सरपंच धिल्लन देसाई, जि.पं.सदस्य शोभना वेळीप व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गावडोंगरी पंचायतीचे सरपंच धिल्लन उर्फ यशवंत देसाई यांनी वॉटर शेड योजनेअंतर्गत गांवडोंगरी पंचायतीला सुमारे दहा लाखाचे साहित्य मिळाले होते. ते काणकोणच्या कृषी अधिकाऱ्यांनी अजून दिले नसून आणलेले दहा लाखांचे सामान धुळ खात पडून असल्याचे सांगितले. कोण तरी राजकारणी गांवडोंगरी पंचायतीचा विकास खुंटू पाहतो व अधिकाऱ्यांवर दडपण आणतो. गांवडोंगरी पंचायतीवर अन्याय होत असल्याने गेल्या ग्रामसभेत येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच गांवडोंगरी भागात जी दोन संस्कृती भवने बांधली आहेत, तीसुद्धा विनावापर असून त्यांची जबाबदारी स्थानिक पंचायतीकडे द्यावी, अशी मागणी त्यानी केली.
यावेळी पैंगीण जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप यांनी विकासासंबधीत आपल्या फाईल्स अडवून ठेवण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी खोतीगावचे माजी सरपंच दया उर्फ उमेश गावकर यानी कुस्के गावात नाबार्डकडून वॉटर शेड योजनेअंतर्गत ७० लाख रूपये मंजूर झाले होते. ते काम अडवून ठेवले आहे. आदिवासींकरीता असलेल्या विविध योजनांचा लाभ खोतीगावच्या आदिवासी लोकांना देण्याचा प्रयत्न आपण करीत असून त्यात आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे विविध योजनेचा लाभ खोतीगाववासियाना मिळू शकला नसल्याचे गावकर यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी संजय कोमरपंत यानी सांगितले की आपल्याबरोबर प्रीती गावकर (आमडाय सांगे), शाणु गावकर (गावकरवाडा केपे), लक्ष्मण आमोलकर (रिवण सांगे) या शेतकऱ्यांचे ऑर्किड फुलांची बागायती तयार करण्याकरीता कंत्राटदाराला बेंकेतून कर्ज काढून पैसे दिले होते. मात्र पॉली हाऊसेस न बांधताच कंत्राटदार पळून गेला. त्या कंत्राटदाराकडून व्याजासह ते पैसे वसूल करून घेण्याची विनंती मुख्यमंत्र्याकड़े केली.
यावेळी सूरज नाईक गावकर व नंदिप भगत यांनी शुक्रवार,शनिवार व रविवारी मडगावहून काणकोणला व काणकोणहून मडगावला काही पर्यटक रेंट व बाईक व टॅक्सी घेऊन प्रवास करतात ते रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असतात. अशावेळी अपघाताची शक्यता असते, अशा पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी पंच आनंद वेळीप, अशोक वेळीप, दयानंद फळदेसाई, मडीवळ यांनी समस्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संयुक्तरित्या बैठक घेऊन सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.