जीपीएससीची तयारी आठवीपासून करा

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : दामोदर विद्यालयाचा ९९वा वर्धापनदिन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:21 am
जीपीएससीची तयारी आठवीपासून करा

लुईस डायगो फर्नांडिस यांचा मरणोत्तर सन्मान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाकडून स्विकारताना त्याचे सुपुत्र माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस. सोबत सभापती रमेश तवडकर, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, चंद्रकांत सुधीर व इतर मान्यवर. (संजय कोमरपंत)


काणकोण : प्रत्येक विद्यार्थ्यांचा करियर प्रश्न इयत्ता आठवीपासून सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जी.पी.एस.सी.च्या परिक्षेची तयारी इयता आठवीपासून व्हायला हवी. त्यादृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावेत. गांव चांगला बनविण्याकरीता गावातील नागरिक, विद्यालये, सहकारी संस्था, देवस्थान ,कोमुनिदाद संस्था चालक चांगले असायला हवेत. तेव्हाच गावचा विकास होण्याबरोबरच तो गाव नावारुपास येतो, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यानी सांगितले.

ते लोलये येथील दामोदर विद्यालयाच्या ९९ व्या वर्धापनदिनी व शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सभापती रमेश तवडकर , समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, संस्थेचे अध्यक्ष विश्वजित वारीक, उपाध्यक्ष वासुदेव भट, खजिनदार निवास प्रभुदेसाई, सचिव संजय पींगे, संस्थेचे व्यवस्थापक आर.एस.नायक, मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर, लोलयेचे उपसरपंच चंद्रकांत सुधीर उपस्थित होते. यावेळी शाळा उभारणीच्या कार्यात मोठे योगदान दिलेल्या तपस्वी आणि दात्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात भगवंत प्रभु देसाई, हरी वारीक, श्रीनिवास प्रभुदेसाई, नारायण जी. प्रभुदेसाई., जयवंत प्रभुदेसाई, यशवंत प्रभुदेसाई, त्याचप्रमाणे रायु रघुनाथ प्रभुदेसाई, दयानंद बांदोडकर, लुईस फर्नांडिस, काशिनाथ प्रभुदेसाई, वेदव्यास आचार्य आणि यशवंतराव चौगुले यांचा समावेश होता. त्यांच्या नातेवाईकांनी हा सत्कार स्वीकारला. यात मंदा बांदेकर, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा समावेश होता. त्याचबरोबर लोलये पंचायतीच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे मागच्या ५० वर्षांत शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानित करण्यात आले. यात गजानन देव, बाळकृष्ण अय्या, सतीश भट, नारायण भटगावकर, कालिदास अय्या, गजानन प्रभुदेसाई, अशोक भट आणि स्व. जगदीश अय्या यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष विश्वजित वारीक यांनी स्वागत केले , मुख्याध्यापक जितेंद्र आमशेकर यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन रेखा पांगी यांनी केले. देविता केणी, पूनम कासार यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. राजेश प्रभु यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सत्कारमूर्तीच्या वतीने स्मिता कामत यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल कामत यांनी आभार मानले.