वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची

दुरुस्ती कामावेळी आवश्यक ती काळजी घेणे, अभियंते, लाईनमनने आपले कर्तव्य बजावणे आणि सुरक्षेसाठी ज्या वस्तू दिलेल्या आहेत, त्या वापरल्यास निर्दोष लाईन हेल्परचे जीव वाचतील. वीज खात्यानेही पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची कामे त्यांनीच करण्यासाठी सक्ती करणे गरजेचे आहे.

Story: संपादकीय |
01st December 2023, 12:16 am
वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची

वीज खात्याला लाईन हेल्परच्या मृत्यूंचे ग्रहण लागले आहे. लाईनमन, वायरमन, लाईन हेल्पर यांच्या सुरक्षेसाठी वीज खात्याने प्रशिक्षणापासून ते सुरक्षा टुल्स खरेदीपर्यंत सगळ्या गोष्टी वेळोवेळी केलेल्या असतानाही कामावेळी होणारा निष्काळजीपणा काही कर्मचाऱ्यांचा जीव घेत आहे. वीज खात्यातील या दुर्घटना थांबवण्यासाठी तातडीने काही उपाय करायला हवेत. ज्यांची पात्रता आहे आणि ज्यांना कामाचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांनाच कामे दिली जावीत. ज्यांना एखादे काम माहीत नाही त्यांना ते काम दिल्यानंतर अपघात होतात, हे स्पष्ट आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये १२ लाईन हेल्परचा वेगवेगळ्या प्रकारे मृत्यू झाला आहे. दोन लाईनमनचा मृत्यू झाला. या वर्षी सर्वाधिक लाईन हेल्पर मृत्युमुखी पडले. चालू वर्षी मार्च ते नोव्हेंबर या दरम्यान पाच हेल्पर जीव गमावून बसले आहेत. अनेक आधुनिक यंत्रणा वीज खात्यात असताना आणि सुरक्षेसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतानाही कर्मचाऱ्यांकडून होणारा निष्काळजीपणा जीवावर बेतत आहे. आपल्या जीवाची काळजी घेणे, हे पहिले प्राधान्य असायला हवे. वीज दुरुस्तीच्या वेळी वीज पुरवठा बंद न करता दुरुस्ती काम करण्याच्या नादात कित्येकदा लाईनमन आणि लाईन हेल्परचा मृत्यू होतो. गोव्यातील बहुतांश घटना या अशाच कारणांमुळे झालेल्या असतात. वीज पुरवठा सुरू असताना सुरक्षात्मक उपाय न करता धोका पत्करणाऱ्या लाईनमन आणि लाईन हेल्परना समज देण्याची गरज आहे. लहानशा चुकीमुळे जीव गमावून बसण्यापेक्षा सुरक्षेसाठी वीज पुरवठा बंद करून काम करणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. वेळ वाचवण्याच्या नादात आणि आपल्याला हे काम जमेल, असा गैरसमज करून घेत असल्यामुळे दुर्दैवी घटना घडतात. दुरुस्ती कामावेळी आवश्यक ती काळजी घेणे, अभियंते, लाईनमनने आपले कर्तव्य बजावणे आणि सुरक्षेसाठी ज्या वस्तू दिलेल्या आहेत, त्या वापरल्यास निर्दोष लाईन हेल्परचे जीव वाचतील. वीज खात्यानेही पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची कामे त्यांनीच करण्यासाठी सक्ती करणे गरजेचे आहे. आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची गय केली जाऊ नये.

'गोवन वार्ता'ने पाच वर्षांतील लाईनमन आणि लाईन हेल्परना आलेल्या मृत्यूबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. ज्यात दोन लाईनमन आणि बारा लाईन हेल्पर गेल्या पाच वर्षांत जीव गमावून बसल्याचे म्हटले आहे. यात लाईन हेल्परची संख्या बारा आहे. महत्त्वाचे म्हणजे दुरुस्तीकाम करण्याची जबाबदारी लाईन हेल्परची नसतेच. ते काम लाईनमनचे. लाईन हेल्परचा अशा पद्धतीने बेकायदा वापर होतो. कामाचा अनुभव यावा म्हणून लाईनमन आपल्या हेल्परला ही जोखमीची कामे करायला लावतात. मुळात त्या कामाचा हेल्परला पूर्वानुभव नसतो. ज्या ठिकाणी दुरुस्ती काम करायचे असते, तिथला वीज पुरवठाही लाईनमनकडून बंद केला जात नाही. वीज पुरवठा सुरू असताना दुरुस्ती कामाची जोखीम पत्करून हेल्पर आपला जीव गमावून बसतात. या हेल्परना अशा दुरुस्ती कामांचे प्रशिक्षण दिलेले नसते. त्यांना तसा मोठा अनुभवही नसतो. लाईनमला कामात मदत करण्यासाठी म्हणून हेल्पर नियुक्त केलेले असतात. पण लाईनमनच्या धाकामुळे हेल्परच लाईनमन होतात आणि त्यातूनच दुर्घटना घडतात.

वीज खात्याने गेल्या एक दोन वर्षांत महत्त्वाचे बदल केले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मडगाव येथे कामावेळी घ्यायची दक्षता यासाठी विशेष सुरक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी हेल्मेट, हातमोजे, बुट, रेनकोट आणि इतर सुरक्षा टुल्स कर्मचाऱ्यांना दिले जातात, पण त्याचाही वापर कमी होतो. वीज खात्याने कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करून रक्कम २० लाखांपर्यंत नेली. कर्मचाऱ्यांच्या विम्याबाबत बँकांशी चर्चा सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत मृत्यू आलेल्या चौदापैकी बारा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत १.९१ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे. प्रत्येकाच्या कुटुंबाला दिलेली रक्कम मोठी नाही. त्यात अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळावी यासाठी नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करतानाच विम्यातही वाढ करावी. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना सरकारी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रियाही गतिमान व्हायला हवी. या सगळ्या गोष्टींसोबतच वीज खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देणे आणि त्या गोष्टींचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.