मद्याच्या धुंदीत रेल्वेच्या टपावर चढला, शॉक लागून जीव गमावला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December 2023, 12:15 am
मद्याच्या धुंदीत रेल्वेच्या टपावर चढला, शॉक लागून जीव गमावला

मडगाव : कामानिमित्ताने झारखंड येथून गोव्यात आलेल्या निर्मोद लगून (२९) हा मद्याच्या नशेत रेल्वेच्या टपावर चढला. त्यावेळी त्याचा स्पर्श २५ हजार व्होल्टच्या वीज वाहिन्यांना झाल्याने तो शॉक लागून खाली पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.

कामगाराला विद्युतवाहिनीचा धक्का बसण्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी मडगाव रेल्वेस्थानकावर घडली होती. झारखंड येथील निर्माेद हा कामाच्या शोधात गोव्यात आला होता. तो गांधी मार्केटनजीकच्या परिसरात राहत होता. त्याला मद्यपानाची सवय होती व त्यातच त्याला नैराश्यही आले होते. यामुळे १६ नोव्हेंबर रोजी निर्माेद हा मडगाव रेल्वेस्थानकावर आलेल्या वालंकिणी वास्को गाडीच्या इंजिनाकडील टपावर चढला. कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरण झालेले असून २५ हजार व्होल्टचा विद्युतप्रवाह वाहिन्यांतून सुरू असतो. त्याच प्रवाहित वीज वाहिन्यांचा धक्का निर्मोद याला लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. कोकण रेल्वे पोलिसांकडून याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. १५ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोकण रेल्वे पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद करुन घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.