तेलंगणात चुरशीने झालेल्या लढतीनंतर निकालाकडे लक्ष

Story: राज्यरंग |
01st December 2023, 12:14 am
तेलंगणात चुरशीने झालेल्या लढतीनंतर निकालाकडे लक्ष

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी ३० रोजी मतदान पार पडले. ११९ मतदारसंघांत २,२९० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस, भाजप आणि एमआयएम यांच्यात ही निवडणूक चुरशीने लढली गेली. राज्याच्या स्थापनेपासून के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने सलग दोन निवडणुकांत बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. काँग्रेसला कर्नाटकप्रमाणे या राज्यातही सत्ता मिळेल, अशी अपेक्षा आहे. लोकसभा आणि हैद्राबाद महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार वाढला आहे. मुस्लिम समाजाची लोकसंख्या अधिक असल्याने एमआयएमची कामगिरी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. जनतेने कोणाला पसंती दिली, हे ३ डिसेंबर रोजीच समजणार आहे.

बहुरंगी लढत असली तरी बीआरएसचा वरचष्मा राहिला आहे. दहा वर्षांतील कामगिरीच्या जोरावर मतदार आपल्यालाच सिंहासनावर बसवतील, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आहे. भाजपने प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील बड्या नेत्यांना उतरवले होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनीही दोन सभा घेतल्या. सत्ता मिळाल्यानंतर ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात येईल, असेही ते म्हणाले. सत्ता आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.

काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे. यासाठीच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रचारापासून दूर असलेल्या सोनिया गांधी यांचा किमान रोड शो व्हावा, यासाठी नेते आग्रही होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा रोड शो होणार होता; मात्र आजारपणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. तरी त्यांनी व्हिडिओद्वारे मतदारांना काँग्रेसवर विश्वास दाखवण्याचे भावनिक आवाहन केले. एमआयएम पक्षाने मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे चित्र समोर आणले असले तरी विधानसभेत त्यांची कामगिरी उल्लेखनीय नाही. हैदराबाद शहरातील चारमिनार, चंद्रयानगुडा, नामपल्ली, याकुतपुरा, बहादुरपुरा, मलकपेट आणि कारवा या पारंपरिक मतदारसंघांसह राजेंद्रनगर आणि ज्युबली हिल्स येथूनही पक्षाने यावेळी उमेदवार उतरवले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १३ टक्के मुस्लिम असून बृहन हैदराबाद भागात मुस्लिम समुदायाची संख्या ४३.४५ टक्के आहे. ४५ जागांवर मुस्लिमांत निकालाचा कौल ठरवण्याची क्षमता आहे.

रिंगणातील २३ टक्के उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक - रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने दिली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ७२ टक्के, तर भाजपच्या ७१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. २०१८ च्या निवडणुकीवेळी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांचे प्रमाण १३ टक्के होते. यावेळी ते वाढून १५ टक्क्यांवर पोचले आहे. २०१८च्या निवडणुकीमध्ये कोट्यधीश उमेदवारांचे प्रमाण २५ टक्के होते. यावेळीही हे प्रमाण तितकेच आहे. सर्व उमेदवारांच्या संपत्तीची सरासरी ४.७१ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ४१.४८ टक्के उमेदवारांची संपत्ती दहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मतदारांनी कुणाकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या, हे ३ डिसेंबरलाच समजणार आहे.

प्रदीप जोशी