फोंडा : जोफीलनगर - फोंडा येथे गुरुवारी दुपारी क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये लाकूड भरत असताना अचानक क्रेनचा ११ केव्ही वीज वाहिनीला स्पर्श झाला. यात मेहबूब पारकेवाले (३२, माईणा- कुडतरी) या क्रेन चालकाचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा इस्पितळातील शवागरात ठेवला आहे.
दीड महिन्यापूर्वी चर्च जवळील धोकादायक झाडे कापण्यात आली होती. कंत्राटदार गुरुवारी ही लाकडे ट्रकमधून भरुन नेणार होता. त्यासाठी क्रेन बोलविण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने लाकूड ट्रकमध्ये भरत असताना क्रेनचा ११ केव्ही या जिवंत वीज वाहिनीला स्पर्श झाला. त्यात क्रेनचालक गंभीर जखमी झाला. त्याला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु इस्पितळात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक नीतेश काणकोणकर यांनी निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा केला.