पणजी : पाळे शिरदोण येथील एका सरकारी शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना आगशी पोलिसांनी तक्रार नोंद झाल्यानंतर तीन तासांच्या आत मिरामार येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये रवानगी करण्यात आली. या मुली गोवा वेल्हा येथील एका आश्रमात राहत होत्या.
आठवीत शिकणाऱ्या १३ व १४ वर्षीय दोन मुली बुधवारी सकाळी १०.४५ वाजल्यापासून गायब झाल्याची तक्रार अॅडेलिना ऑलिह्विएर यांनी आगशी पोलिसांत नोंदविली होती. पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी याची गंभीर दखल घेऊन उपनिरीक्षक रमेश हरिजन, नारायण पिंगे व पराग पारेख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तीन पथके तपासासाठी रवाना केली. आधी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडे चौकशी करण्यात आली. मात्र ठोस माहिती न मिळाल्याने पोलिसांनी आगशी, पणजी व ओल्ड गोवा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. दोन्ही मुलींनी सोबत मोबाईल फोन नेले नव्हते. मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही मोबाईलचे नंबर सर्वेलन्सवर टाकून कॉल रेकॉर्ड तपासून बघितले. मात्र त्यावरून त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेरीस तांत्रिक माहिती आणि इतर विश्वासू सूत्रांच्या माध्यमातून या मुली मिरामार किनाऱ्यावर असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार संध्याकाळी ४.३० वाजता या मुलींना आगशी पोलिसांनी मिरामार येथून ताब्यात घेतले.
या दोन्ही मुलींचा जबाब नोंद करण्यात आला असून त्यांना मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये पाठविण्यात आले आहे. बाल कल्याण समितीच्या शिफारशीनुसार या मुलींना गोवा वेल्हा येथील प्रोव्हेदोरियाच्या आश्रमात ठेवण्यात आले होते.