पणजी : पक्षासाठी तडजोड करणाऱ्या नेत्यांची भाजप नेहमीच आठवण ठेवतो. नीलेश काब्राल यांनी पक्षासाठीच मोठ्या मनाने राजीनामा दिलेला आहे. त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळेल, असे राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
काब्राल २०११ मध्ये भाजपमध्ये आले. तेव्हापासून त्यांनी पक्षासाठी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले. अनेकवेळा तडजाेडीची तयारी दाखवली. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर दिल्लीतून गोव्यात आले, त्यावेळी त्यांच्यासाठी काब्राल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, पर्रीकर पणजीतून लढतील हे नंतर ठरले. आताही त्यांनी पक्षाला गरज होती, म्हणूनच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या तडजोडीची आठवण ठेवून पक्षाकडून भविष्यात त्यांना चांगले फळ मिळेल, असे तानावडे यांनी नमूद केले.
तेलंगणमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातून भाजपचे अनेक नेते गेलेले होते. या सर्वांनाच तेथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तेलंगण मोठे राज्य असल्यामुळे प्रचारा दरम्यान आपल्यासह इतर सर्वच नेत्यांना वेगळा अनुभव मिळाला. तेलंगणची निवडणूक सर्वात शेवटी असल्याने देशभरातील भाजप नेत्यांनी तेथे पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे तेलंगणमध्ये भाजपचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.