एकास अटक : डेव्हिल्स क्लबच्या मालकासह चौघांवर गुन्हा नोंद
म्हापसा : कळंगुट येथील डेव्हिल्स नाईट क्लबमध्ये कर्नाटक राज्यातील तिघा पर्यटकांना दमदाटी करुन १.२१ लाख रूपये रक्कम लुबाडणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी क्लबच्या मालकासह चौघांवर गुन्हा नोंद करत संशयित आरोपी रेमंड उर्फ रेंबो हावसे (रा. झांसी) याला अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी वरील संशयितासह बाऊन्सर, वीरेंद्र शिरोडकर व डेव्हिल्स बार अॅण्ड रेस्टॉरन्टच्या मालकावर हा गुन्हा नोंदवला आहे.
ही लुबाडणूक व खंडणीची घटना दि. २६ रोजी रात्री घडली होती. फिर्यादी प्रवीणकुमार के. आर. (रा. मद्दूर, कर्नाटक) व त्याचे दोघे मित्र गोव्यात पर्यटनासाठी आले होते. घटनेदिवशी कळंगुटमध्ये फिरत असताना त्यांना एक टाऊट्स भेटला. त्याने या तिन्ही पर्यटकांना चांगली सेवा देण्याचे आमिष दाखवत डेव्हिल्स नाईट क्लबमध्ये नेले. तिथे संशयित बाऊन्सरनी या तिन्ही पर्यटकांना दमदाटी केली. त्यांच्याकडून १.२१ हजार रूपये रक्कम लुटली.
यातील डेबिट कार्ड स्विप करून ८८ हजार व फोन पेच्यामार्फत ८ हजार मिळून ९६ हजारांची रक्कम आपल्या बँक खात्यात हस्तांतरीत करून घेतली. तर २५ हजार रूपये रोख रक्कम हिसकावून घेतली. शिवाय मोबाईलची देखील मोडतोड केली.
या लुटीतील १५ हजार रूपये रक्कम वीरेंद्र शिरोडकर या दुसऱ्या हॉटेल मालकाच्या बँक खात्यात तर इतर रक्कम संशयितांनी आपल्या तसेच डेव्हिल्स क्लबच्या खात्यात हस्तांतरीत केली. वीरेंद्र शिरोडकर हे काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष आहेत.
फिर्यादी पीडित पर्यटक गावी गेल्यानंतर तिथून बुधवारी त्यांनी गोवा पोलिसांकडे ई मेलच्या माध्यमातून या प्रकरणी तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी भा. दं.सं.च्या ३९२, ४२७ व ३४ कलमाअंतर्गत वरील संशयितांविरूद्ध गुन्हा नोंद केला. तसेच तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी रेम्बो याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नाईक करीत आहेत.
प्रकरणाशी माझा संबंध नाही : शिरोडकर
या प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही. पोलिसांच्या मते माझ्या बँक खात्यात पैसे जमा केले गेले. पण ते कसे व कुणी जमा केले, याची मला कल्पना नाही. या बाबतीत मी कायदेशीर सल्ला घेतला आहे, असे वीरेंद्र शिरोडकर यांनी सांगितले.