म्हापसा : स्थानिक स्वराज्य संस्थांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड ठोठावणे बंद केले असून राज्याच्या कानाकोपर्यात कचर्याचे ढीग दिसू लागले आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन खाते अकार्यक्षम बनले आहे, असा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केला.
पूर्वी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या दर महिन्याला दोन बैठका होत होत्या. पण गेली दोन वर्षे या बैठका झाल्याच नाहीत. त्यामुळे या खात्यात सर्वकाही ठिक नसल्याचे दिसून येते, असे लोबो म्हणाले. सर्वत्र कचरा पसरलेला दिसतो. मोरजी, मांद्रे, वागातोर, हणजूण, म्हापसा अशा सर्वच ठिकाणी कचर्याचे प्रचंड ढिगारे दिसतात. हा वर्गीकरणयुक्त कचरा प्रकल्पापर्यंत नेला जात नाही व त्याचा कोणलाही त्रास होत नाही, अशी खंत लोबो यांनी व्यक्त केली.
घन कचरा व्यवस्थापन खाते अस्तित्त्वात आहे की नाही, हे मला माहित नाही. योग्य लोक जागेवर असतील तरच काम चालेल. मुख्यमंत्र्यांना काम करायचे आहे, पण काम करण्यासाठी योग्य लोक हवेत, असे ते म्हणाले.
दक्षिण गोव्यातील आेल्या कचर्यासाठी सरकारने कुडचडे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तरीही मडगावमधील कचरा साळगाव प्रकल्पात आणला जातो. पण दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यातील कचरा त्या त्या परिसरातीलच प्रकल्पात जायला हवा, असे लोबो म्हणाले.
कुडचडेचा प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक!
कुडचडे कचरा प्रक्रिया प्रकल्प हा शंभर टन कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पात २०० टनापर्यंत कचर्यावर प्रक्रिया होऊ शकते. पण या ठिकाणी फक्त १८ ते २० टनच कचरा प्रक्रिया होता. दोन-तीन जणांचा अहंकार आणि राजकारणामुळे या प्रकल्पावरील करदात्यांचा पैसा वाया जात आहे. हा प्रकल्प अधिकृत उद्घाटनाविना आहे, असा दावा आमदार लोबो यांनी केला.