ऑरा बिल्डर्सचे सर्व भागीदार, वकिलाविरोधात गुन्हा नोंद
फोंडा : क्रिकेटपटू सुदिन कामत याच्यासह त्याच्या कुटुंबियांची बनावट सही करून कुंडई येथील जमीन हडप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी दोनापावला येथील ऑरा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे भागीदार तथा भाजपचे गट अध्यक्ष जितेंद्र पाठक, लिली जितेंद्र पाठक व मोहन चंद्र पाठक आणि पणजी येथील एका नोटरी अॅड. दामोदर पी. अग्नी यांच्या विरोधात फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मिरामार येथील जय रामकृष्ण कुडचडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारादारांच्या सासरवाडीची कुंडई येथे सर्व्हे क्र. २७/२ मध्ये २,९२५ चौ. मी. जमीन आहे. यातील २,०१७ चौ. मीटर जमीन सासरवाडीच्या सदस्यांनी पॉवर ऑफ अॅटर्नीमार्फत संशयित जितेंद्र पाठक, लिली जितेंद्र पाठक व मोहन चंद्र पाठक यांना विकसित करण्यास दिली होती. याच दरम्यान नोटरी अॅड. दामोदर पी. अग्नी व इतर संशयितांनी षडयंत्र रचून क्रिकेटर सुधीन कामत यांच्या कुटुंबियांच्या सदस्याची बनावट सही करून पाॅवर आॅफ अॅटर्नी तयार केली. त्यात वरील जमीन २,०१७ चौ. मीटर ऐवजी २,९२५ चौ. मीटर दाखवण्यात आली. तसेच वरील बनावट पाॅवर आॅफ अॅटर्नी नोटरीकडे नोंदणी करण्यात आली. त्यानंतर संशयितांनी बनावट तसेच खरी पाॅवर आॅफ अॅटर्नी फोंडा येथील उपनिबंधकाकडे सादर करून विक्री पत्र नोंद करण्यात आले. याशिवाय संशयितांनी सुदिन कामत व कुटुंबियांची बनावट सहीद्वारे सामंजस्य करार केल्याचे समोर आले आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारादारांच्या सासरवाडीची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार, तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, या संदर्भात फोंडा येथील संबंधित उपनिबंधक अडचणीत येण्याची माहिती समोर आली आहे.
याची दखल घेऊन फोंडा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीतेश काणकोणकर यांनी ऑरा बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे भागीदार जितेंद्र पाठक, लिली जितेंद्र पाठक व मोहन चंद्र पाठक आणि पणजी येथील नोटरी अॅड. दामोदर पी. अग्नी यांच्या विरोधात भादंसंच्या ४६५,४६७,४६८,४७१, ४२० आणि आर डब्ल्यू १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.