सेरूला कोमुनिदादचा भूखंड मिळाला १२ वर्षांनी, मात्र, गुन्हा नोंद

खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे भूखंड मिळवल्याचा ठपका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th November 2023, 11:12 pm
सेरूला कोमुनिदादचा भूखंड मिळाला १२ वर्षांनी, मात्र, गुन्हा नोंद

म्हापसा : सेरूला कोमुनिदादचा भूखंड २०११ च्या अर्जानुसार मिळाला. तरीही सदर गावकारावर म्हापसा पोलिसांनी कोमुनिदाद प्रशासकांच्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

संशयित आरोपी राजेश सुहास वेरेकर (रा. शिवा गृहनिर्माण सोसायटी, पर्वरी) यांना हल्लीच सेरूला कोमुनिदादच्या सर्व्हे क्रमांक ३८०/१ जागेमधील फ्लॉट क्र. ४० हा भूखंड मिळाला होता. कोमुनिदाद भूखंडासाठी त्यांनी ८ नोव्हेंबर २०११ रोजी उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक कार्यालयाकडे अर्ज केला होता. आपल्याकडे कोणतीही मालमत्ता नाही, त्यामुळे भूखंड वितरित करावे, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी या अर्जासोबत जोडले होते.

या अर्जानुसार जवळपास १२ वर्षांनी आता कोमुनिदादने वरील भूखंड वेरेकर यांना दिला आहे. पण योग्य माहिती देण्याचे बंधन असताना अप्रामाणिकपणे आणि खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून भूखंड मिळवल्याचा ठपका ठेऊन कोमुनिदाद प्रशासक शिवप्रसाद नाईक यांनी वेरेकर यांच्यावर म्हापसा पोलिसांत तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.दं.सं.च्या १८१, १८२, १९१, १९२, १९३, १९६, ११९, २०० व २४० कलमाअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, या १२ वर्षांत भूखंड मिळेपर्यंत संशयित वेरेकर यांनी आपल्या मेहनतीने काही मालमत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांचा वरील सालचा अर्ज फेटाळण्याचा अधिकार कोमुनिदादला होता. कोमुनिदाद समितीने ही कार्यवाही केली नाही, आणि भूखंड वितरीत केला. कोमुनिदादच्या या प्रक्रियेचा फटका मात्र आता वेरेकर यांना बसला आहे.