भारताचा विश्वचषकात झालेला पराभव

Story: क्रीडारंग |
28th November 2023, 12:37 am
भारताचा विश्वचषकात झालेला पराभव

१४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा करून गेला. मात्र नुकत्याच झालेल्या दोन टी-२० सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जखमेवर थोडीफार फुंकर मारण्याचे काम केले. मात्र संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आयसीसीसोबत बीसीसीआयसुद्धा मालामाल झाली आहे. त्याचबरोबर विश्वचषकामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत निव्वळ २२ हजार कोटी रुपये जमा झाले.

आयसीसीने डिझ्नी प्लस हॉटस्टारला २०२३ ते २०२७ पर्यंत आपले मीडिया राईट्स विकले, ज्याची किंमत ३ अब्ज डॉलर्स आहे! तसेच २०२३ च्या विश्वचषकाला मिळालेल्या प्रायोजकांमुळे आयसीसीने तब्बल १२५० कोटी रुपये कमावले, तर या विश्वचषकातील तिकिटांच्या विक्रीमुळे आयसीसीच्या तिजोरीत १६०० ते २२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचबरोबर आयसीसीने आपल्या वेबसाईटवर प्रत्येक संघाची जर्सी, कॅप आदी सा​हित्य विक्रीला ठेवले होते. क्रिकेटरसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. यामधूनही आयसीसीने चांगली कमाई केली.

आयसीसीच्या कमाईमध्ये बीसीसीआयचाही हिस्सा असतो. तिकीट विक्री, मीडिया राईट्स, संघाची जर्सी, कॅप आदींच्या विक्रीमध्येही बीसीसीआयचा हिस्सा असतो. त्याचप्रमाणे भारतीय संघाच्या किटचा प्रायोजक अदिदासने बीसीसीआयला २५० कोटी दिले आहेत. ड्रिम ११ जो बीसीसीआयचा प्रमुख प्रायोजक आहे, त्याने २०२६ पर्यंत बीसीसीआयसोबत तब्बल ३५८ कोटींचा करार केला आहे. हा पैसा थेट बीसीसीआयच्या तिजारीत जाणार आहे. दरम्यान, विश्वचषकातील सामने ज्या ज्या स्टेडियममध्ये झाले, त्या प्रत्येक स्टेडियमसाठी बीसीसीआयने ५० कोटी खर्च केले. जेणेकरून प्रेक्षकांपासून खेळाडूंपर्यंत कोणालाही कसलीच कमतरता भासली नाही.

डिस्ने प्लस हॉटस्टारने विश्वचषकाचे सामने मोफत क्रिकेट रसिकांना उपलब्ध करून दिले. मात्र त्याचा हॉटस्टारला तोटा नाही, तर फायदाच अधिक झाला आहे. या विश्वचषकात हॉटस्टारला २६ प्रायोजक मिळाले. यामध्ये हॉटस्टारने ४ हजार कोटी रुपयांची कमाई केली. १० सेकंदांच्या जाहिरातीमागे हॉटस्टारने ३० लाख रुपये चार्ज केले, तर भारत विरुद्ध पाकिस्तान व अंतिम सामन्यासाठी हॉटस्टारने १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल ६० लाख रुपये चार्ज केले. त्यामुळे हॉटस्टारसुद्धा मालामाल झाली.

भारतीय संघाने विश्वचषकाची सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली, यामुळे ज्या ज्या ठिकाणी भारतीय संघाचे सामने झाले, त्या ​ठिकाणची हॉटेल्स फुल झाली होती. याचा फायदा तेथील हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात झाला. त्याचबरोबर विमान कंपन्यासुद्धा चांगल्याच हवेत होत्या. विदेशातूनही मोठ्या प्रमाणात क्रिकेट रसिक सामने पाहण्यासाठी भारतात आल्यामुळे अनेक विमान कंपन्यांची चांदी झाली. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी मुंबई ते अहमदाबाद विमानाचे तिकीट तब्बल २४,००० रुपयांना विकले गेले. तसेच मोठ्या प्रमाणात तिकिटांचाही काळा बाजार झाला. यामुळे मात्र अनेक क्रिकेट रसिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली. या विश्वचषकात भारत सरकार, आयसीसी, बीसीसीआय, हॉटस्टार, हॉटेल व्यावसायिक, ​विमान कंपन्या एवढेच काय तर तिकिटांचा काळाबाजार करणारे सुद्धा मालामाल झाले. फक्त कमतरता राहिली, ती विश्वचषक जिंकण्याची आणि याची खंत बीसीसीआयसोबतच तमाम भारतीयांना कायमच राहील.

प्रवीण साठे, गाेवन वार्ताचे उपसंपादक आहेत