वर्ल्डकप हरल्याचे कवित्व नको - नवी ऊर्जा हवी

वर्ल्ड कपच्या क्रिकेटचा महासंग्राम नुकताच संपन्न झाला. देशाच्या कोट्यावधी जनतेने क्रिकेटचा आस्वाद घेतला. संपूर्ण सामने जिंकून भारताने विश्वविक्रम प्राप्त केला. मात्र अंतिम सामन्यात दुर्दैवी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताच्या एकूण कामगिरी संदर्भात संशयास्पद कामगिरी निर्माण झाल्याचे वक्तव्य सर्वत्र ऐकायला मिळाले. ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळला त्या पद्धतीने भारतीयांच्या अपेक्षा उंचावणे व अंतिम सामन्यात भारताने हा मुकुटमणी प्राप्त करावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगणे साहजिकच होते. मात्र तसे घडले नाही याला कारणेही अनेक आहेत.

Story: प्रासंगिक |
26th November 2023, 03:26 am

अनेकांनी भारतीय संघावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले. खेळाच्या संदर्भात शस्त्रक्रिया करून अनेकांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न झाला. भारत अमुक पद्धतीने खेळला असता तर निश्चित जिंकला असता. रोहित शर्माने खराब फटका मारण्याची गरज नव्हती. अमुक खेळाडूने असे करायला नको होते. तमुक खेळाडूने असे केले म्हणूनच भारत हरला. भारत संपूर्णपणे कमकुवत ठरला. भारताच्या संघामध्ये असलेली ऊर्जा कुठे कमी झाली. याची कारणे काय. अशा वेगवेगळ्या कारणांवर मते मतांतरे ऐकायला मिळाली. अनेकांनी या परावाचा बराच धसका घेतल्याचे पहावयास मिळाले. एरवी भारताला हा जागतिक स्वरूपाचा मुकुटमणी पुन्हा एकदा प्राप्त व्हावा ही सर्व भारतीयांची मोठी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. याचा अर्थ असा नाही की मुकुटमणी प्राप्त झाला नाही. म्हणून भारतीय संघ कमकुवत आहे. वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासूनच्या संग्रामात भारताची कामगिरी सरस ठरली हे मान्य करावे लागेल. ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळला त्या पद्धतीने भारतीयांच्या अपेक्षा उंचावणे व अंतिम सामन्यात भारताने हा मुकुटमणी प्राप्त करावा अशा प्रकारची अपेक्षा बाळगणे साहजिकच होते. मात्र तसे घडले नाही याला कारणेही अनेक आहेत. सुरुवातीला नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने यशाची पहिली पायरी प्राप्त केली होती. त्यावर भारताला यश आले नाही हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एरवी गेल्या अनेक वर्षांची तुलना करता ऑस्ट्रेलिया हा भारताच्या एकूण सरासरीपेक्षा चांगल्या प्रकारचा संघ आहे हे अनेक वेळा त्यांनी दाखवून दिलेले आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने जागतिक स्तरावर क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी अशी कामगिरी निर्देशित केलेली आहे हे विसरून चालणार नाही. मात्र हल्लीच्या काळामध्ये भारत त्यापेक्षा पुढे जात एक चांगल्या प्रकारचा संघ व संघर्षाच्या वेळी सुद्धा भारतीय संघाने यशाची पताका फडकावीत एक उत्कृष्ट संघ म्हणून आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे.

खेळामध्ये यश अपयश हे चालूच असते. अनेक वेळा क्रिकेट सामने होतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होते असे नाही. अनेक वेळा अपयशाचे कडू चाखावे लागते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र जागतिक स्वरूपाच्या क्रिकेट संग्रामामध्ये भारताला आलेले अपयश यावरून भारताच्या अपयशाची चाचपणी किंवा त्याचा पंचनामा करणे बरोबर वाटत नाही. गेल्या दहा सामन्यामध्ये भारताने ज्या पद्धतीचे कामगिरी केली त्याचीही वाखाणणी करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कुठल्याही खेळाचा चाहता हा तेवढ्याच पद्धतीने त्या खेळावर प्रेम करत असतो. यामुळे आपल्या संघाने किंवा आपल्या खेळाडूंनी यशाची चव चाकल्यास सदर घटना मनाला लागते. हा नैसर्गिक न्याय आहे. मात्र एका सामन्यातून भारताच्या एकूण कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे मनाला पटणारे नाही. ज्या पद्धतीने भारतीय संघ या मालिकेमध्ये खेळत होता ते पाहिल्यास वर्ल्ड कपचा मुकुटमणी भारताच्या शिरपेच्यामध्ये खोवला जाणार हे निश्चित होते. मात्र शेवटच्या सामन्याचा दिवस भारतीयांचा नव्हता हे अनेक वेळा सिद्ध झाले. ज्या पद्धतीने भारताची फलंदाजी सुरू झाली तेव्हापासून अनेक वेळा चाचपडत खेळणारा संघ व त्यानंतर कमी आलेली धावसंख्या याच्या पार्श्वभूमीवर भारतीय गोलंदाज निश्चितच किमया करू शकेल व भारताला वर्ल्डकपचा मुकुट प्राप्त होईल अशा प्रकारची अपेक्षा होती. मात्र यापूर्वीच्या सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने सिराज, मोहम्मद शमी यांनी कामगिरी केली होती तशा प्रकारची सरस कामगिरी होऊ शकली नाही हे तेवढेच खरे. प्रत्येक वेळा फलंदाज असो किंवा गोलंदाज त्याच प्रकारची ऊर्जा दररोज असावी किंवा ती असणे हे शक्य नसते त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात. प्रत्येकाच्या मानसिकतेवर त्यांची कामगिरी अवलंबून असते. दहा सामन्यातील भारताचा दिवस होता. मात्र अंतिम सामन्यात दिवसाने भारताला सहकार्य केले नाही हे मान्यच करावे लागेल. एरवी भारताने हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते असे प्रत्येकाचे मत आहे. संपूर्ण भारतीयांची ती इच्छा होती. कारण क्रिकेट जगतामध्ये विश्वविक्रम प्राप्त करणारा व येणाऱ्या काळातही ज्यांच्याकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या गळ्यातील ताईत समजले जाणारे विराट कोहली किंवा हीटमॅन रोहित शर्मा यांच्यासाठी हा मुकुटमणी भारताने प्राप्त करावा व या खेळाडूंचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा अशी भारतीयांची इच्छा होती. मात्र नियतीला वेगळेच काही मान्य होते. नियतीने भारताला साथ दिली नाही. यामुळेच भारत हरला. याच्यावरून भारतीय संघावर दुबळा किंवा भारतीय खेळाडूवर व संघावर असलेले प्रेम कमी होणार नाही याची विशेष दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. क्रिकेट खेळ असो किंवा अन्य खेळ असो. एक संघ जिंकतो तर दुसरा संघ हरतो. मात्र हरणाऱ्या संघावर टीकेचा भडिमार करण्याऐवजी दुसऱ्या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या ऊर्जेने नव्या आकांक्षाने मैदानात उतरून सामना जिंकण्याची क्षमता खेळाडूंमध्ये निर्माण व्हावी व त्यासाठी क्रीडाप्रेमींनी अशा संघासाठी आपला पाठिंबा देणे तेवढेच महत्त्वाचे असते. अंतिम सामन्यासाठी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीयांची गर्दी जमली होती. एक वेगळ्या प्रकारचा विलक्षण अनुभव या सामन्याच्या माध्यमातून पहावयास मिळाला. आतापर्यंतची सर्वात मोठी गर्दी स्टेडियमवर जमली होती. यामुळे भारतीय संघावर व भारताने हा मुकुटमणी प्राप्त करावा अशा प्रकारची इच्छा बाळगणाऱ्या थोरांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अनेक राजकीय नेत्यांनी या सामन्याला आपली उपस्थिती लावली होती. अनेकांच्या मनामध्ये भारताने हा वर्ल्ड कप जिंकावा यासाठी असलेली इच्छा यातून भारताचे मनोबल वाढावे यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य करण्यात येत होते. मात्र भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ ठरला हे अनेकवेळा पहावयास मिळाले. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन संघाने क्षेत्ररक्षण केले त्यातून भारतीय संघाच्या जवळपास ३० धावा वाचवल्या गेल्या. याचाच फटका भारताला सहन करावा लागला हे नाकारून चालणार नाही. वर्ल्ड कपचा महासंग्राम संपल्यानंतर ज्या पद्धतीने मते मतांतरे व्यक्त करण्यात आली त्यातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती अशी की ज्या पद्धतीने गेल्या दहा सामन्यांमध्ये भारताचा सरस गोलंदाज सिराज यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. त्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गोलंदाजीपासून दूर का ठेवण्यात आले. या संदर्भाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचे समोर आलेली आहे. त्यांचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र यदाकदाचित सिराजने गोलंदाजीचा भार सांभाळला असता तर काही प्रमाणात बदल येणे शक्य झाले असते. असे नमूद करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया संघाचा हेड फलंदाजी करीत होता त्यातून ऑस्ट्रेलिया संघाला यशाच्या समीप नेले हे नाकारून चालणार नाही. यदाकदाचित सदर फलंदाज बाद झाला असता तर काही प्रमाणात वेगळा निर्णय येऊ शकला असता. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. अनेकवेळा जीवदान प्राप्त झालेल्या या फलंदाजाने एकमेव किल्ला लढवीत आपल्या संघाला वर्ल्डकपचा मुकुट प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी भूमिका निभावली हे नाकारून चालणार नाही. आता वर्ल्ड कप संपलेले आहे. त्याचे कवित्व गाण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. मात्र या लेखाच्या माध्यमातून भारतीय संघावर असलेले प्रेम आत्मीयता यामध्ये तसूभरही कमी होणार नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संघाने अनेक वेळा भारतीयांना सुखद धक्के दिलेले आहेत. दिवाळीचा आनंद साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे एका सामन्याच्या माध्यमातून भारतीय संघाचा पाणउतारा करणे बरोबर वाटणार नाही. भारतीय फलंदाज असो किंवा गोलंदाज यांनी जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर व आत्ताच्या दमाचे सर्वांचे चाहते विराट कोहली यांनी उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघ तर भारत देशाची गौरवशाली परंपरा जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचेही कौतुक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकाच सामन्याच्या माध्यमातून या खेळाडूंच्या महान कार्याचा अपमान होणार नाही. याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात भारतीय संघाला निश्चितच यश प्राप्त होईल यात अजिबात शंका नाही. मात्र ज्या ज्या वेळी महत्त्वाचे सामने असतात त्या त्या वेळी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण भारताच्या कोट्यावधी जनतेच्या त्या अपेक्षा आहेत. या अपेक्षेला तडा जाऊ नये यासाठी कार्य होणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संघाचे एकूण व्यवस्थापन आतापर्यंत चांगले राहिलेले आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही व यातून कोट्यावधी भारताच्या एकूण आनंदाला तडा जाणार नाही याकडे विशेष लक्ष देणे व प्रत्येक वेळी भारताला व भारतीयांच्या अपेक्षांच्या ऊर्जेला संधी मिळणे तेवढेच महत्त्वाचे आहे असे सांगावेसे वाटते. पुनश्च भारताने चांगला प्रकारचा खेळ केल्याबद्दल भारताच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करावेसे वाटते. 


  • उदय सावंत
  • वाळपई.